दापोली : येथील तरुणांना आणि कलाप्रेमींना आगामी ‘गारंबीचा बापू’ या बहुचर्चित मराठी चित्रपटातील प्रमुख कलाकार यतीन कार्येकर आणि प्रसाद ओक यांच्याशी थेट संवाद साधण्याची विशेष संधी मिळणार आहे.
कोळथरे येथील ‘कै. कृष्णामामा महाजन स्मृतिप्रतिष्ठान’ यांच्या वतीने ‘संवाद… विचार… प्रेरणा… यशाच्या दिशेने’ या संकल्पनेवर आधारित ‘युवा प्रेरणा’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम शुक्रवार, १६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता दापोली अर्बन बँक सीनियर सायन्स कॉलेजच्या सभागृहात पार पडणार आहे.
या कार्यक्रमात यतीन कार्येकर आणि प्रसाद ओक हे त्यांच्या आयुष्यातील कलाक्षेत्रातील प्रवास, आलेले विविध अनुभव, त्यातून मिळालेली शिकवण आणि यशाची गुरुकिल्ली याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.
तसेच कला, समाज आणि आयुष्य या महत्त्वाच्या विषयांवर ते तरुणांशी मुक्त संवाद साधणार असून या रंगतदार प्रश्नोत्तरांच्या सत्रात सहभागी होण्याची आणि थेट प्रश्न विचारण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे.
वाचन, विचार, संवाद आणि यश या सूत्रांवर आधारित असलेल्या या कार्यक्रमासाठी सर्वांना प्रवेश खुला ठेवण्यात आला आहे. सभागृहात प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर बैठक व्यवस्था उपलब्ध असणार आहे.
तरी दापोली आणि परिसरातील जास्तीत जास्त तरुणांनी तसेच नागरिकांनी या प्रेरणेच्या कट्ट्यावर उपस्थित राहून या विशेष संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले आहे.