लांजा : मुंबई-गोवा महामार्गावर बंद स्थितीत उभ्या असलेल्या ४०७ टेम्पोला वाचविण्याच्या प्रयत्नात गोव्याच्या दिशेने जाणारा कंटेनर महामार्गालगतच्या दरडीवर आदळून पलटी झाल्याची भीषण घटना शुक्रवारी सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास अंजणारी येथील वरचा बसस्टॉप परिसरात घडली. अपघातात कंटेनरच्या केबिनचा अक्षरशः चुराडा झाल्याने चालक आत अडकून पडला होता. पोलिस व अग्निशमन दलाच्या जवानांनी केबिन कापून चालकाची सुखरूप सुटका केली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, राजकुमार रामकिशोर साहू (वय ३५, रा. लोटी रीवा, मध्यप्रदेश) हा आपल्या ताब्यातील कंटेनर (क्र.एमएच ४६ डीसी २७६३) मधून पोलादी कॉइलचा माल घेऊन वाशिमहून गोव्याकडे जात होता. सकाळी साडेनऊच्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावरील अंजणारी वरचा बसस्टॉप येथे आल्यानंतर समोर बंद अवस्थेत उभा असलेला ४०७ टेम्पो वाचविण्याच्या प्रयत्नात कंटेनरवरील चालकाचा ताबा सुटला. त्यानंतर कंटेनर रस्त्याच्या उजव्या बाजूला जाऊन महामार्गालगतच्या दरडीवर आदळून पलटी झाला. अपघाताची तीव्रता एवढी होती की कंटेनरच्या पुढील केबिनचा पूर्णपणे चुराडा झाला. त्यामुळे चालक राजकुमार साहू हा केबिनमध्ये अडकून पडला.
घटनेची माहिती मिळताच लांजा पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथक, हातखंबा वाहतूक मदत केंद्राचे अधिकारी तसेच एमआयडीसी रत्नागिरी विभागाचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. यानंतर बचाव पथकाने मोठ्या शर्थीचे प्रयत्न करत लोखंडी केबिन कापून चालकाला बाहेर काढले. जखमी चालकाला तत्काळ उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
या बचावकार्यात लांजा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक देवकन्या मैंदाड, म.पो.हेड.कॉन्स्टेबल उर्मिला शेडे, कॉन्स्टेबल सुजाता महाडिक, चालक मांजरेकर व जाधव तसेच हातखंबा वाहतूक मदत केंद्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यजित घुले, एएसआय तळेकर, पोलीस कर्मचारी दोरखंडे व खेडेकर तसेच एमआयडीसी रत्नागिरी विभागाचे उपअग्निशमन अधिकारी विवेक राणे, चालक हर्षल आखाडे, अग्निशमन विमोचक प्रवीण पवार, प्रमोद राठोड, पृथ्वीराज मोरे आणि देवराज बंडगर यांनी मोलाची भूमिका बजावत चालकाची सुखरूप सुटका केली.
