लोटे : – मुंबई गोवा महामार्गावर खेड ते चिपळूण दरम्यान गुणदे फाटा येथील सर्विस रोडवर आज प्रचंड वाहतूक कोंडी झालेली पहावयास मिळाली. येथील उड्डाणपुलाचे काम अद्याप अपूर्ण असल्यामुळे उपलब्ध सर्व्हिस रोड वरूनच गणेश भक्तांना प्रवास करावा लागत आहे. मात्र या सर्विस रोडवर सुद्धा मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत.त्यामुळे वाहन चालकांना यातून मार्ग काढताना कसरत करावी लागत आहे. येथील सर्विस रोड ची दुरावस्था लक्षात घेऊन गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महामार्गाच्या ठेकेदाराने त्याची योग्य ती डागडुजी करण्याची गरज होती. परंतु येथील स्थानिक लोकप्रतिनिधी किंवा महामार्गाचा ठेकेदार यापैकी कोणीही याकडे गांभीर्याने पाहिले नाही.
परिणामी हजारो वाहन चालकांना येथील एका किलोमीटरसाठी एक एक दीड दीड तास घालवावा लागत आहे. येथील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी महामार्ग पोलीस, स्थानिक पोलीस प्रशासन आणि परिसरातील स्थानिक युवा वर्ग शर्थीचे प्रयत्न करत आहेत. मात्र काही वेळा आलेल्या चाकरमान्यांपैकी काहीजण अति उत्साह दाखवून वाहतुकीला अडथळा होईल अशा पद्धतीने आपले वाहन चुकीच्या लेन मधून पुढे दामटण्याचा प्रयत्न करतात आणि वाहतूक कोंडी आणखी गंभीर होऊन जाते. आम्हा कोकणातील गणेश भक्तांसाठी दरवर्षीचा गणेशोत्सव अशा खड्ड्यांमधून प्रवास करतच साजरा करावा लागतो. याला कारण म्हणजे आम्ही निवडून दिलेले लोकप्रतिनिधीच आहेत, अशा संतप्त भावना वाहतूक कोंडी मध्ये अडकलेल्या चाकरमण्यांकडून व्यक्त होत होत्या.