खेड : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खेड तालुक्यात यंदा २२ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणरायाची प्रतिष्ठापना, तर तब्बल १२ हजार ७०० घरगुती गणपतींची स्थापना होणार आहे. गणेशोत्सव शांततेत आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडावा, यासाठी प्रशासन व पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे.
खेड शहरासह तालुक्यात विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून गणरायाच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये एस.टी. स्टँड आगार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, नातुवाडी प्रकल्प सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ भरणे, मुरली मनोहर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, गणेश मित्र मंडळ कळंबणी बु., सुकिवली गोपाळ समाज सेवा मंडळ, वडार समाज युवक मंडळ भरणे, जय गणेश मित्र मंडळ भरणे, शिवसेना उबाठा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ खेड, खेड शहर शिवसेना सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, वडार समाज सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ महात्मा फुले नगर, महाराष्ट्र बेलदार संघटना सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ भरणे, वडार समाज संघटना सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ दस्तुरी आदी मंडळांचा समावेश आहे. तसेच भारतीय जनता पार्टीचा गणपती शिवाजी चौक, टायटनचा राजा गणेशोत्सव मंडळ शिवतर रोड, बंजारा समाज सार्वजनिक गणेश मंडळ वेरळ, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आंबवली, एमआयडीसी गणेशोत्सव मंडळ पीरलोटे, श्री गणेशोत्सव मंडळ हुंबरी, संघर्ष मित्र मंडळ भरणे, शिवनेरी मंडळ भरणे, जयहिंद गणेश मित्र मंडळ घाणेखुंट आणि मोरया गणेश मित्र मंडळ आवाशी यांचाही सार्वजनिक गणेशोत्सवात सहभाग राहणार आहे.
गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच भाविकांना सुरक्षित वातावरण मिळावे, यासाठी खेड पोलिसांकडून विशेष बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. यामध्ये ६ पोलीस अधिकारी, ४० पोलीस कर्मचारी आणि ५० होमगार्ड यांचा समावेश आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, प्रमुख चौक, गर्दीची ठिकाणे तसेच वाहतूक मार्गांवर पोलिसांची विशेष नजर राहणार आहे. घरगुती तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असताना नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करून गणेशोत्सव शांततेत व पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
खेड तालुक्यात २२ सार्वजनिक आणि १२ हजार ७०० घरगुती गणपतींच्या आगमनामुळे संपूर्ण तालुका ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने दुमदुमणार असून, गणेशभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.