चिपळूण : तालुक्यातील अवैध दारूधंदे, गावठी हातभट्टी तसेच गोवा बनावटीच्या दारूची विक्री व वाहतूक यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आंदोलनाचा पवित्रा घेतलेल्या सामाजिक कार्यकर्ते प्रवीण जाधव यांनी आज, 2 ऑक्टोबर रोजी पुकारलेले आत्मदहन आंदोलन राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या लेखी आश्वासनानंतर स्थगित केले आहे.
शिरळ, बौद्धवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते प्रवीण जाधव यांनी तालुक्यातील अवैध दारूधंदे व गोवा बनावटीच्या दारूच्या विक्री-वाहतुकीविरोधात कारवाई करण्याच्या मागणीसाठी 15 ऑगस्ट 2026 रोजी उपोषणाचा इशारा दिला होता. त्यावेळी राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाईसाठी एक महिन्याची मुदत मागून जाधव यांनी उपोषण मागे घ्यावे, अशी विनंती केली होती.
मात्र, या एक महिन्याच्या कालावधीत अपेक्षित कारवाई झाली नसल्याचा आरोप करत जाधव यांनी पुन्हा 2 ऑक्टोबर रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे प्रशासनासमोरही हा प्रश्न निर्माण झाला होता. दरम्यान, राज्य उत्पादन शुल्क विभागाने जाधव यांना 30 सप्टेंबर रोजी लेखी पत्र देऊन तालुक्यातील अवैध मद्यनिर्मिती, वाहतूक व विक्रीविरोधात कारवाई सुरू असल्याचे स्पष्ट केले. 16 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर या कालावधीत 24 ठिकाणी छापे टाकून दारूबंदी कायद्यान्वये कारवाई करण्यात आली असून 24 आरोपींना अटक करण्यात आल्याचे विभागाने नमूद केले आहे. तसेच यापुढेही अवैध दारूधंदे व अंमली पदार्थांच्या विक्रीविरोधात नियमित गस्त व तपासणी करून कायद्यानुसार कारवाई करण्याचे लेखी आश्वासन विभागाने दिले. या आश्वासनानंतर प्रवीण जाधव यांनी आजचे आत्मदहन आंदोलन स्थगित केले आहे.