मुंबई : “मुंबईतील शिवाजी पार्क येथे प्रस्तावित असलेले आंदोलन हे दिल्लीतील जंतर-मंतरवरील देशविरोधी आंदोलनाचाच भाग-२ आहे. आंदोलनाच्या नावाखाली छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळ्यांचा अवमान करण्याचा अजेंडा चालवला जात असून, महाराष्ट्र हा अपमान कदापि सहन करणार नाही,” असा इशारा मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी आज मुंबई येथे दिला. भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
पत्रकार परिषदेत बोलताना मंत्री नितेश राणे म्हणाले, “आमचा विरोध विशिष्ट व्यक्तींना नसून त्यांच्या देशविरोधी अजेंड्याला आहे. देशविरोधी आणि संविधानविरोधी कारवायांमध्ये सहभागी असणाऱ्या घटकांचे समर्थन करत मुंबईत पुन्हा जंतर-मंतरसारखे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न सुरु आहे. सोशल मीडियावर प्रसारित केलेल्या एका ग्राफिकमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळ्यांची अत्यंत आक्षेपार्ह पद्धतीने तुलना करून शिवरायांचा घोर अपमान करण्यात आला आहे. स्वराज्यासाठी बलिदान देणाऱ्या मावळ्यांचा असा अवमान देश कधीही स्वीकारणार नाही.”
ठाकरे बंधूंवर टीका:
हिंदुत्व आणि छत्रपती शिवरायांच्या विचारांचा दावा करणाऱ्या ठाकरे बंधूंवर निशाणा साधताना नितेश राणे म्हणाले, “शिवरायांचा आणि हिंदू देवी-देवतांचा अपमान करणाऱ्या घटकांवर कारवाई करण्याची हिंमत दाखवण्याऐवजी दोन्ही ठाकरे अशा आंदोलकांना पाठिंबा देत आहेत. बाळासाहेबांच्या विचारांचा त्याग करून हे लोक आता तुष्टीकरणाचे राजकारण करणाऱ्यांच्या मागे उभे राहत आहेत. आमच्यासाठी पक्ष आणि पदापेक्षा छत्रपती शिवाजी महाराज आणि आमची अस्मिता सर्वोच्च आहे.”
लोकशाहीत आंदोलनाचा अधिकार, पण अराजकता खपवणार नाही:
सरकारची भूमिका स्पष्ट करताना त्यांनी सांगितले की, लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यास कोणाचाही विरोध नाही. मात्र, आंदोलनाच्या आडून औरंगजेब किंवा टिपू सुलतानचा अजेंडा राबवून छत्रपतींचा अपमान केला जात असेल तर पोलीस प्रशासन याची गंभीर दखल घेईल. तसेच, विरोधकांकडून व्होट चोरीचे केले जाणारे आरोप हे केवळ स्वतःचे अपयश लपवण्यासाठी आखलेले वितंडवाद आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
प्रमुख मागण्या:
१. संबंधित आक्षेपार्ह पोस्टप्रकरणी आयोजक अभिजित दिपके यांनी तात्काळ जाहीर माफी मागावी.
२. मुंबई पोलिसांनी या आक्षेपार्ह सोशल मीडिया पोस्टची आणि प्रस्तावित आंदोलनाची गांभीर्याने दखल घेऊन कायदेशीर कारवाई करावी.
शिवाजी पार्क येथील आंदोलन हा देशविरोधी कारस्थानाचा भाग; शिवरायांचा अपमान महाराष्ट्र खपवून घेणार नाही – मंत्री नितेश राणे
