दापोली : आंतरराष्ट्रीय समुद्रकिनारा स्वच्छता दिनाचे औचित्य साधून १९ सप्टेंबर २०२६ रोजी दापोली तालुक्यातील कर्दे ग्रामपंचायतीच्या वतीने कर्दे समुद्रकिनारी विशेष स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले होते समुद्रकिनारा स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक ठेवण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या अभियानाला कर्दे येथील स्थानिक ग्रामस्थांसह मुंबईहून आलेल्या ग्रामस्थांचा तसेच ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व कर्मचारी यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कर्दे समुद्रकिनारी मोठ्या प्रमाणात जमा झालेला प्लास्टिक कचरा, प्लास्टिकच्या बाटल्या, पिशव्या, कागद तसेच इतर टाकाऊ वस्तू हटविण्यासाठी ग्रामस्थांनी श्रमदान केले. समुद्रकिनाऱ्याची स्वच्छता राखण्यासोबतच समुद्र व सागरी पर्यावरणाचे संरक्षण करण्याचा संदेश या अभियानातून देण्यात आला.
या स्वच्छता अभियानासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून रत्नागिरी जिल्ह्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेली समुद्रकिनारा स्वच्छता मशीन विशेष उपयोगी ठरली. या मशीनच्या माध्यमातून समुद्रकिनाऱ्यावरील कचरा व घाण साफ करण्याचे काम करण्यात आले. स्वच्छता मशीन उपलब्ध करून देण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल जिल्हाधिकारी श्री. मनोज जिंदाल तसेच गुहागर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी श्री. स्वप्निल चव्हाण यांचे कर्दे ग्रामपंचायतीच्या वतीने मनःपूर्वक आभार मानण्यात आले.
मान्यवरांच्या उपस्थितीत अभियानाचे उद्घाटन
स्वच्छता अभियानाचे उद्घाटन कर्दे ग्रामपंचायतीचे प्रशासकीय अधिकारी श्री. सागडे, ग्रामसेवक श्री. भोरजे, माजी सरपंच श्री. सचिन तोडणकर, पंचायत समिती स्वच्छता विभागाच्या कर्मचारी श्रीमती पूजा देवकर तसेच कर्दे ग्रामस्थांच्या उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी उपस्थितांनी समुद्रकिनारा स्वच्छ ठेवण्याची आणि पर्यावरणाचे रक्षण करण्याची सामूहिक जबाबदारी अधोरेखित केली. समुद्रकिनाऱ्यावर येणाऱ्या पर्यटकांनी व नागरिकांनी कचरा इतरत्र न टाकता योग्य ठिकाणी जमा करावा, प्लास्टिकचा वापर कमी करावा आणि समुद्रकिनाऱ्याची नैसर्गिक सुंदरता अबाधित ठेवावी, असे आवाहन करण्यात आले.
स्वच्छता सप्ताह साजरा करण्याचे आवाहन
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी कर्दे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच श्री. सचिन तोडणकर यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले. समुद्रकिनाऱ्याची स्वच्छता ही केवळ एका दिवसापुरती मर्यादित न राहता सातत्याने सुरू राहणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच कर्दे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून स्वच्छता सप्ताह साजरा करण्याचे आवाहन त्यांनी केले.
या उपक्रमामुळे कर्दे समुद्रकिनाऱ्याच्या स्वच्छतेबाबत जनजागृती होण्यास मदत झाली असून, ग्रामस्थांच्या एकजुटीतून पर्यावरण संवर्धनाचा सकारात्मक संदेश देण्यात आला. स्थानिक ग्रामस्थ, मुंबईकर ग्रामस्थ, ग्रामपंचायत पदाधिकारी व कर्मचारी यांनी एकत्रितपणे केलेल्या प्रयत्नांचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले.
स्वच्छ समुद्रकिनारा हा निरोगी पर्यावरणाचा पाया असून, कर्देचा समुद्रकिनारा स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक ठेवण्यासाठी सर्वांनी सातत्याने योगदान द्यावे, असा संदेश या अभियानातून देण्यात आला.