मंडणगड : थील सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या मंडणगड कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजगता व नाविण्यता विभाग, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजगता मार्गदर्शन केंद्र रत्नागिरी, औद्योगिक प्रशिक्षण विकास संस्था(आयटीआय)मंडणगड यांच्या संयुक्त विद्यमाने पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास मंडणगडचे नायब तहसिलदार श्री. रावसाहेब खानविलकर प्रमुख पाहुणे म्हणून तर अध्यक्षा म्हणून औद्योगिक प्रशिक्षण विकास स्था(आयटीआय)मंडणगडच्या प्रमुख सौ. सायली मोरे उपस्थित होत्या. महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री नाम. योगेश कदम आभासी पध्दतीने कार्यक्रमास उपस्थित होते. यावेळी रत्नागिरी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजगता विभागाचे श्री. पांडूरंग कानडे, आयएमसी सदस्य श्री. विजय खैरे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वाल्मिक परहर, उपप्राचार्य डॉ. विष्णु जायभाये, आयटीआयचे श्री. अमित तांबे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वल करुन व पंडीत दीनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.यावेळी श्रीमती निशा कांबळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.वाल्मिक परहर यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
नामदार योगेश कदम यांनी सांगितले की, महाराष्ट्र शासनाच्या वतीने या मेळाव्याच्या रुपाने एक स्तुत्य उपक्रम राबविला असून परिसरातील आस्थापनांमध्ये स्थानिक तरुणांना रोजगार मिळण्यासाठी त्याचा चांगला उपयोग होणार आहे. मंडणगड-दापोली-खेड मतदार संघातील युवक-युवतींना रोजगार उपलब्ध व्हावेत यासाठी आपण नेहमीच प्रयत्नशील आहोत. मंडणगड येथे एम.आय.डी.सी. मंजूर झाली असून लवकरच त्या माध्यमातून विविध आस्थापनांमध्ये मोठया प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहेत. येथील तरुणांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रसुध्दा उपलब्ध करुन देत आहोत.
प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना मा. रावसाहेब खानविलकर यांनी सांगितले की, महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित केलेल्या या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून परिसरातील युवक-युवतींना रोजगाराची मोठी संधी प्राप्त झाली असून त्यांनी या संधीचा लाभ घ्यावा व भविष्यात आपल्या तालुक्यातच त्यांनी रोजगार निर्माण करावा असे आवाहन केले.
यावेळी श्री. पांडूरंग कानडे यांनी सांगितले की, अशा प्रकारचे रोजगार मेळावे वेळोवेळी आयोजित करुन स्थानिक बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्याचा महाराष्ट्र शासनाचा मानस असून सर्वांनी या संधीचा लाभ घ्यावा असे सांगितले. त्यानंतर श्री. विजय खैरे यांनी उपस्थित आस्थापना प्रतिनिधींचे स्वागत करुन मुलाखतीसाठी उपस्थित युवकांना शुभेच्छा दिल्या.
अध्यक्षस्थानावरुन बोलताना सौ. सायली मोरे यांनी सांगितले की, महाराष्ट्रच्या कानाकोप-यात विखुरलेल्या बेरोजगार युवक-युवतींना महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास विभागाने ही सुवर्णसंधी उपलब्ध दिली आहे. आपली शैक्षणिक पात्रता व आपण आत्मसात केलेली कौशल्ये याच्या आधारावर आपण विविध पदाकरिता मुलाखत देवून यशस्वी व्हावे असे सांगितले.
सदर मेळाव्याला परिसरातील विविध आस्थापनांनी व युवक-युवतींनी चांगला प्रतिसाद दिला. सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ.संगीता घाडगे यांनी तर आभार उपप्राचार्य डॉ. विष्णु जायभाये यांनी मानले.