खेड : पर्यावरण रक्षण आणि निसर्गाचा समतोल राखण्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत आज सोनगाव भोईवाडी येथे कांदळवन सहव्यवस्थापन समिती, निसर्ग पर्यटन समितीचे सदस्य आणि गावातील ग्रामस्थांनी एकत्र येत निर्माल्य संकलन व त्याची योग्य विल्हेवाट लावण्याचा उपक्रम अत्यंत उत्साहात आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडला.

गणेशोत्सवानंतर जमा झालेले निर्माल्य अस्ताव्यस्त न फेकता त्याचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी सर्व ग्रामस्थ एकत्र आले होते. या उपक्रमांतर्गत खालीलप्रमाणे नियोजनबद्ध काम करण्यात आले :

जैविक कचऱ्यापासून सेंद्रिय खत : निर्माल्यातील फुले, पाने आणि इतर नैसर्गिक घटक वेगळे करण्यात आले. हे जैविक घटक झाडांच्या बुंध्याशी टाकण्यात आले, जेणेकरून कालांतराने त्यापासून उत्तम दर्जाचे सेंद्रिय खत तयार होऊन झाडांचे योग्य पोषण होईल.

प्लास्टिकचे सुरक्षित व्यवस्थापन व पुनर्वापर : निर्माल्यासोबत गोळा झालेले सर्व प्लास्टिक आणि असेंद्रिय कचरा पूर्णपणे वेगळा करण्यात आला. हा कचरा पर्यावरणाला हानी पोहोचवू नये म्हणून ‘सह्याद्री निसर्ग मित्र’ यांच्या टीमशी संपर्क साधून योग्य पुनर्प्रक्रियेसाठी (Recycling) त्यांच्या स्वाधीन केला जाणार आहे.

या निर्माल्यामध्ये जुने पडदे, वायर, काचा, फोटो फ्रेम, तोरण, लाईटची तोरणे, बल्ब आणि प्लास्टिकच्या पिशव्या आदी वस्तूंचा समावेश होता.

निसर्गाचा ऱ्हास रोखण्यासाठी आणि कचरा व्यवस्थापनाचा वस्तुपाठ घालून देण्यासाठी सोनगाव भोईवाडीच्या ग्रामस्थांनी व समितीने उचललेले हे पाऊल परिसरात कौतुकास्पद ठरत आहे. “आपल्या परिसरातील स्वच्छता आणि पर्यावरण रक्षणासाठी सर्वांनी अशाच प्रकारे जागरूक राहणे गरजेचे आहे,” असा संदेश या उपक्रमातून ग्रामस्थांनी दिला आहे.

या उपक्रमात कांदळवन सहव्यवस्थापन समिती, सोनगावचे अध्यक्ष राजाराम गोविंद दिवेकर, समिती सदस्य विकास पडवळ, लक्ष्मण दिवेकर, लवू दिवेकर, मिथुन दिवेकर, कु. अवनी पडवळ, कु. रुद्र सैतेवडेकर तसेच कांदळवन प्रतिष्ठान, रत्नागिरीच्या प्रकल्प समन्वयक सौ. क्रांती मं. दिवेकर आदी उपस्थित होते.