मुंबई : कांदिवली पूर्वेतील ठाकूर व्हिलेज, दत्तानी पार्क रोड परिसरात यंदाचा सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा होत आहे. हॅथवे साई स्टार गणेशोत्सव मंडळाच्या वतीने करण्यात आलेली आकर्षक सजावट, विद्युत रोषणाई आणि विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांमुळे गणेशभक्तांचे विशेष लक्ष वेधले जात आहे.
मंडळाचे उत्सव प्रमुख शिवसेना नेते आमदार अनिल परब व प्रगतिशील शेतकरी उद्योजक सदानंद उर्फ आप्पा कदम यांच्या संकल्पनेतून हॅथवे साई स्टार केबल ॲण्ड डेटा कॉम प्रा. लि.च्या माध्यमातून गेल्या २६ वर्षांपासून सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन केले जात आहे. मंडळाचे कार्य पुढे नेण्यासाठी अनिकेतदादा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली नितीन केणी, शंकर नायर, मंडळाचे अध्यक्ष रामदास मुरकुटे, ओजस केणी, आकाश नायर यांच्यासह मंडळांचे सदस्य मगेश कदम, परेश शेट्टी, अशोक शिंदे, मनोहर कदम पदाधिकारी आणि कार्यकर्ते अहोरात्र परिश्रम घेत आहेत. यंदाच्या गणेशोत्सवातील प्रमुख आकर्षण म्हणजे भगवान शंकराची भव्य मूर्ती आणि त्यांच्या पिंडीवर पडणारा आकर्षक जलप्रपात. रंगीबेरंगी विद्युत रोषणाई आणि कलात्मक सजावटीमुळे संपूर्ण परिसराला भक्तिमय तसेच मनमोहक स्वरूप प्राप्त झाले आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने लालबाग, परळ, गिरगाव तसेच मुंबईतील विविध भागांतील पारंपरिक ढोल-ताशा पथकांचे सादरीकरणही आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. ढोल-ताशांचा निनाद आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने परिसर दुमदुमून जात असून भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. हॅथवे साई स्टार गणेशोत्सव मंडळाला यापूर्वी विविध गणेशोत्सव स्पर्धांमध्ये अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यामुळे मंडळाची सजावट, देखावे आणि सामाजिक उपक्रमांकडे दरवर्षी गणेशभक्तांचे विशेष लक्ष असते. यंदाच्या उत्सवातून धार्मिक श्रद्धेसोबत सामाजिक जाणीव, कलात्मकता आणि समाज प्रबोधनाचा संदेश देण्याचा प्रयत्न मंडळाने केला आहे. त्यामुळे भक्ती, संस्कृती आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम या गणेशोत्सवात पाहायला मिळत आहे.
कांदिवली पूर्वेतील या आगळ्यावेगळ्या गणेशोत्सवाला परिसरातील नागरिक, गणेशभक्त आणि भाविकांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभत असून उत्सवाला दिवसेंदिवस चांगला प्रतिसाद मिळत आहे.
कांदिवली पूर्वेत हॅथवे साई स्टार गणेशोत्सवाची भक्तिमय पर्वणी !
