जळगाव : प्रचंड गाजावाजा करून बांधण्यात आलेल्या मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्पाचे पितळ पहिल्याच पावसात उघडे पडले आहे. काही दिवसांपूर्वीच मिसिंग लिंकवर खड्डे पडल्याचे फोटो समोर आले होते. त्यानंतर सोमवारी पहाटे मिसिंग लिंकच्या एन्ट्री पॉईंटजवळ दरड कोसळल्याची घटना घडली.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. “मिसिंग लिंक रोड नव्हे, तर ‘विकास मिसिंग’ लिंक रोड!” असे त्यांनी म्हटले आहे.

पुणे–मुंबई द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्पाचा मोठा गाजावाजा करण्यात आला होता. अवघ्या दोन महिन्यांपूर्वी मोठ्या थाटामाटात या रस्त्याचा उद्घाटन सोहळा पार पडला. मात्र, पहिल्याच पावसात या रस्त्यावर खड्डे पडले. त्यावर लोकांनी प्रश्न उपस्थित केला असता, “ट्रायल सुरू होती,” असे सांगण्यात आले. आता थेट दरड कोसळल्यामुळे वाहतूक बंद करण्यात आली आहे.

“खरं तर महायुती सरकारचा विकास केवळ जाहिरातींमध्येच दिसतो. प्रत्यक्षात मात्र ‘विकास’ मिसिंग आहे!” असेही त्या म्हणाल्या. जनतेच्या पैशातून उभारलेले प्रकल्प टिकाव धरत नसतील, तर तो विकास नसून जनतेच्या विश्वासाशी केलेला खेळ आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.