पुणे – “आधुनिक काळातील आजच्या तरुणाईमध्ये भारत कुठे आहे,” असा प्रश्न ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ आणि डेक्कन काॅलेज अभिमत विद्यापीठाचे कुलपती डाॅ. भूषण पटवर्धन यांनी शनिवारी येथे उपस्थित केला. “आजची युवा पिढी बघताना, मला त्यांच्या विचारात, आचारात, विहारात, आहारात..कुठेही भारतीयत्व आढळत नाही. नेमक्या कुठल्या मूल्य – निष्ठांवर या पिढीचा पाया आधारला आहे, हे समजत नाही”, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
निमित्त होते, गुरुकुल प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणा-या पुरस्कार प्रदानाचे. याप्रसंगी राजाराम रंगनाथ अष्टेकर आणि शकुंतलाबाई राजाराम अष्टेकर यांच्या स्मृत्यर्थ देण्यात येणारा आदर्श माता – पिता पुरस्कार जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील पिंपरी येथील शिक्षण संस्था चालक विजया आणि रामकिसन सोळंके यांना तर कृष्ण मोडक स्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार ज्ञानप्रबोधिनी निगडी येथील केंद्रप्रमुख डाॅ. मनोज देवळेकर यांना डाॅ. पटवर्धन यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. सन्मानपत्र, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि धनादेश, असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे.
यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष कृष्णा अष्टेकर,कार्याध्यक्ष डाॅ. सागर देशपांडे, कार्यकारी संचालक सदानंद महाजन,विश्वस्त शिवप्रसाद कामत, मैथिली कामत, श्रीमती जाई कामत हे मान्यवर उपस्थित होते. कर्वे रस्त्यावरील अश्वमेध सभागृहात हा कार्यक्रम झाला.
