ठाणे:- मुंबई भांडुप येथील महाराष्ट्रीय शिक्षण संस्थेच्या पराग विद्यालय अँड ज्युनिअर कॉलेज येथील प्राथमिक विभागात कार्यरत असलेल्या सहाय्यक शिक्षिका श्रीमती सायली संदेश राणे यांना मुंबई महानगरपालिकातर्फे दिला जाणारा आदर्श शिक्षक महापौर पुरस्कार जाहीर झाला आहे.
त्यांच्या प्रदीर्घ, गुणवत्तापूर्ण आणि विद्यार्थीहिताच्या कार्याची दखल घेत हा सन्मान जाहीर झाल्याने भांडुप परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
सायली राणे गेल्या ३२ वर्षांपासून पराग विद्यालयात कार्यरत असून शिस्तप्रिय, कार्यतत्परताव अध्यापन या कामाची दखल घेऊन त्यांना पुरस्कार प्राप्त झाला आहे
विद्यार्थ्यांबरोबर अध्यापनापुरते मर्यादित न राहता विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी त्या सातत्याने प्रयत्नशील असतात.
गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क, गणवेश, पुस्तके आणि वह्या यासाठी त्या आर्थिक मदत करतात. तसेच परिसरात गृहभेटी देऊन शिक्षणापासून दूर गेलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे महत्त्वपूर्ण काम त्यांनी केले आहे. त्यांच्या या सामाजिक व शैक्षणिक कार्याची दखल घेत भांडुप मेडिको संस्थेने त्यांना २०२४ मध्ये आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित केले होते.
सायली राणे या अभ्यासू शिक्षिका म्हणूनही परिचित आहेत. नवीन शैक्षणिक तंत्रज्ञान आत्मसात करून त्यांचा विविध शैक्षणिक कामासाठी वापर करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतात. त्यांच्या अध्यापनातील सहज व सुलभ शैलीमुळे विद्यार्थीवर्गाला आपलेसे केले .
तालुकास्तरीय दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत २०२३ मध्ये त्यांनी द्वितीय क्रमांक पटकावला होता. तसेच त्या तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणूनही काम करत आहेत.शाळेच्या विविध उपक्रमांमध्ये त्या उत्साहाने सहभागी होत सातत्याने काम करत आहेत.शाळेच्या गुणवत्तावाढीतही मोलाचे योगदान दिले आहे
त्यांच्या योगदानातून शाळेला राज्यस्तरीय ‘अ’ दर्जा प्राप्त करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
तसेच शाळेच्या उपक्रमशील आणि गुणवत्तापूर्ण कार्याची नोंद सरल पोर्टलवर होण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. त्यांच्या या सातत्यपूर्ण योगदानामुळे पराग विद्यालयाची शैक्षणिक गुणवत्ता आणि उपक्रमशीलता अधिक ठळकपणे समोर आली आहे.
३२ वर्षांच्या शैक्षणिक सेवेतून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उल्लेखनीय योगदान दिले आहे
सध्या अनेक ठिकाणी मराठी माध्यमाच्या शाळांमधील विद्यार्थी संख्या कमी होत असताना पराग विद्यालयच्या विद्यार्थी संख्येत मात्र वाढ होत आहे. कर्तव्यनिष्ठ, गुणवंत आणि विद्यार्थीकेंद्री शिक्षकांच्या योगदानामुळे भांडुप परिसरात या सेमी इंग्रजी माध्यमाच्या शाळेने पालकांचा विश्वास संपादन केला आहे.
महानगरपालिकेचा महापौर आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेबद्दल त्यांचे महाराष्ट्रीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाळकृष्ण बनेशेठ. सचिव माजी आमदार सुभाष बने.यांचे सर्व संचालक. मुख्याद्यापक सर्व कर्मचारी वृंद यांनी अभिनंदन केले.
संस्था अध्यक्ष बाळकृष्ण बनेशेठ यांचे वाढदिवसाच्या दिवशीच हा पुरस्कार जाहीर झालेने पराग शैक्षणिक संकुलात आनंदोत्सव साजरा करण्यात येतो आहे. त्याचेवर भांडूप परिसरातून अभिनंदन वर्षाव होत आहे.
