मुंबई : राज्यातील वाढता मानव व वन्यजीव संघर्ष रोखण्यासाठी आणि मानवी जीविताचे रक्षण करण्यासाठी राज्य सरकारने आधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेण्याचा निर्णय घेतला आहे.
या अंतर्गत पहिल्या टप्प्यात राज्यातील सुमारे एक हजार संवेदनशील गावांमध्ये ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ (एआय) आधारित अलर्ट यंत्रणा उभारण्यात येणार आहे. याशिवाय, वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांना तातडीने पायबंद घालण्यासाठी २६० कोटी रुपयांच्या सर्वसमावेशक कृती आराखड्यासह राज्यात १० अत्याधुनिक नियंत्रण कक्ष, दोन रेस्क्यू सेंटर आणि १० उपचार केंद्रे उभारण्यास राज्य वन्यजीव मंडळाच्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे.
मंत्रालयात वनमंत्री तथा मंडळाचे अध्यक्ष गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी ही बैठक पार पडली.