चिपळूण : तालुक्यात सुरू असलेल्या अवैध दारूधंद्यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी 15 ऑगस्ट 2026 रोजी उपोषण केले होते. यावेळी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रांताधिकारी चिपळूण यांच्या समक्ष कारवाईसाठी एक महिन्याची मुदत मागितली होती. मात्र, एक महिना उलटूनही अपेक्षित कारवाई झाल्याची माहिती देण्यात आलेली नसल्याचा आरोप करत शिरळ येथील सामाजिक कार्यकर्ते प्रविण राजाराम जाधव यांनी 2 ऑक्टोबर 2026 रोजी चिपळूण उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.
याबाबत जाधव यांनी काल 21 सप्टेंबर 2026 रोजी चिपळूणचे उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी यांना निवेदन दिले आहे. 15 ऑगस्ट रोजी आपल्या कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले होते. त्यावेळी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या निरीक्षकांनी पत्र देऊन कारवाईसाठी एक महिन्याची मुदत मागितली होती. मात्र, मुदत संपूनही संबंधित विभागाने कोणत्या प्रकारची कारवाई केली, याची माहिती आपल्याला देण्यात आलेली नाही, असे जाधव यांनी निवेदनात म्हटले आहे.
चिपळूण तालुक्यात अवैध दारूधंदे, गावठी हातभट्टी दारूचे उत्पादन तसेच गोवा बनावटीच्या दारूची विक्री व वाहतूक सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. अवैध दारूधंद्यांना आळा घालण्याचे आश्वासन पूर्ण झाले नसल्याचे जाधव यांनी म्हटले आहे.
उपोषण सोडताना एका महिन्यात अवैध दारूधंद्यांवर आळा बसला नाही, तर आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार 2 ऑक्टोबर रोजी चिपळूण उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे. या घटनेस जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, उपविभागीय पोलीस अधिकारी चिपळूण तसेच संबंधित अधिकारी जबाबदार राहतील, असेही निवेदनात म्हटले आहे.

पोषण आहारानंतर आता अवैध दारूधंद्यांविरोधात लढा
प्रविण जाधव यांनी यापूर्वी 15 ऑगस्ट 2016 रोजी जिल्हा परिषद शाळांमध्ये देण्यात येणाऱ्या पोषण आहाराच्या दर्जाबाबत पंचायत समिती चिपळूणसमोर उपोषण केले होते. त्यांच्या या उपोषणाची दखल घेत शाळांना उत्कृष्ट दर्जाचा पोषण आहार देण्याबाबत शासनामार्फत प्रयत्न करण्यात आले होते. हे उपोषण यशस्वी झाल्यानंतर आता पुन्हा एकदा चिपळूण तालुक्यातील अवैध दारूधंदे बंद व्हावेत आणि तरुण पिढी व्यसनापासून दूर राहावी, यासाठी जाधव यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. यापूर्वी उपोषण केल्यानंतर आता त्यांनी 2 ऑक्टोबर रोजी आत्मदहनाचा इशारा दिल्याने प्रशासन याबाबत कोणती भूमिका घेते, याकडे लक्ष लागले आहे.