चिपळूण : आमदार शेखर निकम यांच्या प्रयत्नांतून अर्थसंकल्पीय तरतुदीअंतर्गत मंजूर झालेल्या चिपळूण परिसरातील तीन महत्त्वपूर्ण विकासकामांचा भूमिपूजन समारंभ सोमवार, दि. २३ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. या कामांसाठी एकूण ६ कोटी ८३ लाख रुपयांची अंदाजपत्रकीय तरतूद करण्यात आली आहे.
या कार्यक्रमांतर्गत सोमवारी दुपारी १२ वाजता चिपळूण–गुहागर बायपास रोडच्या मजबुतीकरण व डांबरीकरण कामाचा भूमिपूजन समारंभ होणार आहे. या कामासाठी १ कोटी ९१ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यानंतर दुपारी १२.३० वाजता पिंपळी–नांदिवसे रस्ता सुधारणा व डांबरीकरण कामाचे भूमिपूजन होणार असून, त्यासाठी ९२ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
तर दुपारी १ वाजता पेढांबे येथील मोठ्या पुलाच्या पुनर्बांधणी कामाचा भूमिपूजन समारंभ होणार आहे. या महत्त्वपूर्ण कामासाठी ४ कोटी रुपयांची अंदाजपत्रकीय तरतूद करण्यात आली आहे. ही सर्व भूमिपूजने आमदार शेखर निकम यांच्या हस्ते होणार आहेत.
या तीनही विकासकामांमुळे संबंधित भागातील रस्ते व पुलाच्या सुविधांमध्ये सुधारणा होण्यास मदत होणार आहे.
या भूमिपूजन समारंभास महायुतीचे सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते तसेच ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
