खेड : ज्येष्ठ व्यक्तींच्या निधनानंतर त्यांच्या स्मृतींना उजाळा देत हार-फुले अर्पण करण्यापेक्षा, त्यांनी आयुष्यभर केलेल्या कार्याची जाणीव ठेवून ते जिवंत असतानाच त्यांचा सन्मान व्हावा, या सामाजिक आणि संवेदनशील विचारातून तालुका्यातील शिवखुर्द श्रीरामवाडीच्या वतीने एक विशेष सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमातून गावासाठी विविध क्षेत्रांत योगदान देणाऱ्या ज्येष्ठ व्यक्तींचा तसेच प्रतिकूल परिस्थितीत आपल्या मुलांना घडविणाऱ्या मातांचा सन्मान करण्यात आला.
बीगावातील ज्येष्ठ मंडळींनी समाजासाठी आणि गावाच्या विकासासाठी दिलेले योगदान पुढील पिढीसमोर यावे, तसेच त्यांच्या कार्याची योग्य दखल घेतली जावी, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश होता. यावेळी गावाच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देणाऱ्या मान्यवरांना ‘शिवखुर्द रत्न पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. यामध्ये माजी तहसीलदार तुकाराम इनरकर, राजाराम डफळे , राजाराम भुवड, तु .ल. डफळे, धोंडू पास्टे, तूुकाराम कुळे , तुकाराम इप्ते आणि प्रकाश कुळे साहेब यांचा सन्मान करण्यात आला.

कै. बाबू बाळाजी भुवड यांना ‘शिवगावचे शिल्पकार’ पुरस्कार

गावातील विविध समाजघटकांना एकत्र घेऊन, गावातील लोकांना आपलेसे करत शिवगावाला एकत्र ठेवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणारे कै. बाबू बाळाजी भुवड यांच्या कार्याचीही यावेळी विशेष दखल घेण्यात आली. त्यांच्या कार्याची आठवण कायम गावाच्या स्मरणात राहावी आणि त्यांनी घडवलेल्या सामाजिक एकोप्याला आदरांजली मिळावी, या उद्देशाने त्यांना ‘शिवगावचे शिल्पकार’ या पुरस्काराने गौरविण्यात आले.त्यांच्या कार्यातून गावातील सामाजिक एकोपा, बंधुभाव आणि सर्व समाजघटकांना सोबत घेण्याची भावना जपली गेली. त्यामुळे त्यांच्या योगदानाचा गौरव हा केवळ एका व्यक्तीचा सन्मान नसून गावाच्या सामाजिक एकतेचा गौरव असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

प्रतिकूल परिस्थितीत मुलांना घडविणाऱ्या मातांचा गौरव
या कार्यक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे प्रतिकूल परिस्थितीत आपल्या मुलांना वाढवून त्यांना जीवनात मोठे करणाऱ्या मातांचा ‘आदर्श माता पुरस्कार’ देऊन करण्यात आलेला सन्मान. आईच्या त्यागाची आणि कष्टांची जाणीव ठेवत तिच्या कार्याचा गौरव जिवंतपणी व्हावा, या भावनेतून हा पुरस्कार देण्यात आला. यामध्ये रुक्मिणीबाई रामू कुळे, शांतीबाई सिताराम भावे, पंडीबाई बाबाजी भेकरे, भिकिबाई विश्राम पास्टे आणि कुंदाताई अनंत पांचागळे यांचा ‘आदर्श माता’ पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
आईच्या कष्टांना अनेकदा शब्दांत मांडणे कठीण असते. मात्र, आपल्या मुलांच्या भविष्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जात त्यांना घडविणाऱ्या या मातांचा सन्मान करून त्यांच्या त्यागाला समाजासमोर मानाचे स्थान देण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला. ज्येष्ठांचा अनुभव, समाजासाठी योगदान देणाऱ्या व्यक्तींचे कार्य आणि मातांचा त्याग यांचा सन्मान एका व्यासपीठावर करण्याचा शिवखुर्द श्रीरामवाडीचा हा उपक्रम सामाजिक दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरला. जिवंतपणीच व्यक्तीच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा सन्मान करण्याची ही संकल्पना इतर गावांसाठीही प्रेरणादायी ठरणारी आहे.