मुंबई : मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावर रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत रिसवाडी गावाजवळ गुरुवारी सकाळच्या सुमारास एका खासगी बसला अचानक आग लागल्याची घटना घडली. महामार्गावरील पुणे लेनवर किलोमीटर क्रमांक १६.०० च्या दरम्यान ही घटना घडली.

बसला अचानक आग लागल्यानंतर काही वेळातच आगीने संपूर्ण बसला वेढले. आगीत बस पूर्णपणे जळून खाक झाली. सुदैवाने बसमधील सर्व प्रवासी सुरक्षित असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

घटनेची माहिती मिळताच पनवेल महानगरपालिका आणि खोपोली नगरपरिषद यांच्या अग्निशमन दलाच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच अधिक अग्निशमन बंब घटनास्थळी रवाना करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

घटनेमुळे द्रुतगती महामार्गावरील वाहतुकीवर काही प्रमाणात परिणाम होण्याची शक्यता असून, रसायनी पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. याबाबत पुढील तपास सुरू आहे.