मुंबई : निवडणूक आयोगाचा भ्रष्ट कारभार व सत्तेतील भाजपा सरकारला मदत करणाऱ्या कामाबद्दल जनतेच्या मनामध्ये तिव्र रोष आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांनी लोकशाही व संविधानाला पायदळी तुडवले आहे. पक्षपाती काम करणारे ज्ञानेशकुमार यांचे कृत्य लोकशाहीची हत्या करणारे असून त्यांना सेवेतून बडतर्फ करून अटक करावी या मागणीसाठी प्रदेश काँग्रेस सोमवार दिनांक २८ सप्टेंबर रोजी राज्यभर आंदोलन करणार आहे.
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी वेळोवेळी “वोट चोरी” संदर्भात आवाज उठविलेला आहे यावर आत्ता शिकामोर्तबच झाले आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे भारतीय जनता पक्षाला फायदा होण्याच्या दृष्टीने व एकतर्फी पध्दतीने निवडणूक आयोगाचा कारभार करत आहेत. निवडणूक आयोगाच्या हुकूमशाही वृत्तीमुळे मतदार याद्यांमध्ये अनेक पात्र मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. मतदारयादी मधून पात्र मतदारांचे नाव वगळणे ही बाब लोकशाहीवर घाला घालणारी आहे. एसआयआर मोहिमेच्या माध्यमातून निवडणूक आयोगाने देशभरातील तब्बल १३ कोटी मतदारांची नावे वगळली आहेत, यात महाराष्ट्रातील तब्बल ३ कोटींपेक्षा जास्त मतदार वगळले आहेत. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ रोजी ४७ लाख मतदार वाढवले होते, या ४७ लाखांचा ठावठिकाणाही लागत नाही. बिहार, पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतही लाखो मतदार वगळले होते. निवडणूक आयोगाचा कारभारच संशयास्पद असून निष्पक्ष व पारदर्शी निवडणूकांसाठी ज्ञानेशकुमार सारख्या भ्रष्ट अधिकाऱ्याला बडतर्फ केले पाहिजे, अशी काँग्रेसची मागणी आहे. सोमवारी राज्यातील सर्व जिल्ह्यात तिव्र आंदोलन केले जाणार असून या आंदोलनात जिल्ह्यातील सर्व नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, आमदार, खासदार सहभागी होतील अशी माहिती प्रदेश काँग्रेसने दिली आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या विरोधात काँग्रेस आक्रमक, सोमवार दिनांक २८ रोजी राज्यभर आंदोलन..
