चिपळूण : गणेशोत्सवानंतर परिसरात निर्माण झालेल्या कचऱ्याचे संकलन करून स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी SCONच्या वतीने पुण्यात विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. बाबा भिडे पूल ते अलका टॉकीज चौक या परिसरात राबविण्यात आलेल्या या मोहिमेत SCONच्या ३५ स्वयंसेवकांनी सक्रिय सहभाग घेत अवघ्या एका तासात तब्बल १ हजार किलो कचरा संकलित केला.
स्कॉन प्रोजेक्ट्सचे श्री. निलेशजी चव्हाण यांच्या अभिनव संकल्पनेतून, रोटरी क्लब ऑफ SCON PRO आणि SCON PRO Foundation यांच्या संयुक्त विद्यमाने हा पर्यावरणपूरक उपक्रम आयोजित करण्यात आला. गणेशोत्सवाच्या काळात मोठ्या प्रमाणात निर्माण झालेला कचरा हटवून परिसर स्वच्छ करण्यासोबतच नागरिकांमध्ये पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती करण्याचा या उपक्रमाचा उद्देश होता.
स्वच्छता मोहिमेदरम्यान स्वयंसेवकांनी परिसरातील विविध प्रकारचा कचरा गोळा करून त्याचे संकलन केले. या सामूहिक प्रयत्नातून मोठ्या प्रमाणात कचरा हटविण्यात आल्याने परिसराच्या स्वच्छतेला हातभार लागला. या मोहिमेला PMC आरोग्य निरीक्षक अतिक सय्यद आणि श्री. रोहित महाजन यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
या संपूर्ण उपक्रमाचे श्री. निनाद निलेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभावी नियोजन व अंमलबजावणी करण्यात आली. तसेच श्री. महेश मायदेव, सौ. अंजली काळे, श्री. शैलेश मोरे, श्री. संजय रोडे, श्री. राहुल पुरकर, श्री. अपूर्वा ब्राम्हणे आणि श्री. संदीप देवकर यांनीही उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले.
यावेळी उपक्रमामागील भावना व्यक्त करताना श्री. निनाद निलेश चव्हाण म्हणाले,
“बाप्पा येणार म्हणून आपण घर, मन आणि परिसर सजवतो; बाप्पा निरोप घेतात तेव्हा त्याच परिसराची स्वच्छता करून निसर्ग जपणे, हीदेखील भक्तीच आहे. स्वागत श्रद्धेने… निरोप जबाबदारीने… हीच बाप्पांप्रती खरी सेवा!”
गणेशोत्सव हा केवळ उत्सव न राहता त्यातून सामाजिक आणि पर्यावरणीय जबाबदारीची जाणीव निर्माण व्हावी, यासाठी SCONच्या या उपक्रमाने सकारात्मक संदेश दिला. उत्सवाबरोबरच स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाची परंपरा निर्माण करण्याचा संकल्प या माध्यमातून व्यक्त करण्यात आला.
पुण्यात स्कॉनच्या ३५ स्वयंसेवकांची स्वच्छता मोहीम ; अवघ्या एका तासात १ हजार किलो कचरा संकलित…
