मंडणगड : तालुक्यातील वेळास व वाल्मीकनगर येथील मराठी शाळांमधील शिक्षकांच्या कार्यमुक्तीच्या निर्णयावरून पालक आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांमध्ये प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त होत आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शिक्षक कार्यमुक्तीच्या सूचना रद्द करून आवश्यक ते शिक्षक तातडीने उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी पालकांकडून करण्यात आली आहे.
वेळास व वाल्मीकनगर शाळेत शिक्षकांची संख्या कमी झाल्याने अध्यापन व्यवस्थेवर परिणाम होत असल्याचे पालकांचे म्हणणे आहे. यापूर्वी वेळास शाळेतील शिक्षकांना कार्यमुक्त करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानंतर शाळेतील एका शिक्षकाला वाल्मीकनगर येथे पाठविण्याची कार्यवाही करण्यात आली. मात्र, शिक्षक कार्यमुक्त झाल्यास वेळास शाळेतील विद्यार्थ्यांचेही शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता असल्याने पालक व शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी त्यास विरोध केला.
यासंदर्भात संबंधित प्रशासनाकडे निवेदने देऊन शिक्षक कार्यमुक्त करू नयेत, अशी मागणी करण्यात आली. संबंधित अधिकारी यांनी प्रकरणाचा अभ्यास करून निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्याचे पालकांनी सांगितले. मात्र, त्यानंतर वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांकडून दबाव आणला जात असल्याचा आरोप पालक व स्थानिक प्रतिनिधींनी केला आहे. प्रशासनाकडून दिली जाणारी आश्वासने आणि प्रत्यक्षातील कार्यवाही यामध्ये विसंगती असल्याची नाराजीही व्यक्त करण्यात आली. दरम्यान, गणपती उत्सवाच्या काळात नवीन शिक्षकांची भरती झाल्यानंतरही वेळास येथून वाल्मीकनगर शाळेत गेलेले पूर्वीचे शिक्षक अद्याप वेळास शाळेत परतले नसल्याचे पालकांचे म्हणणे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.