मुंबई : दिल्लीसह देशाच्या विविध भागांत तरुणाई अर्थात ‘जेन-झी’ पिढीने रस्त्यावर उतरून विविध प्रश्नांवर आवाज बुलंद केला. विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाची देशभर चर्चा झाली. या आंदोलनात वापरण्यात आलेल्या अनोख्या आणि प्रभावी पोस्टर्सचे विशेष प्रदर्शन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त, २ ऑक्टोबर रोजी मुंबईतील टिळक भवन येथील महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात आयोजित करण्यात आले आहे.
या प्रदर्शनाचे उद्घाटन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे नवनियुक्त प्रभारी डॉ. सिरीवेल्ली प्रसाद यांच्या हस्ते होणार आहे. पेपरफुटीच्या प्रश्नावर विद्यार्थ्यांनी दिल्लीतील जंतरमंतरसह देशाच्या विविध भागांत आंदोलन केले. विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला त्यांच्या सर्जनशील आणि उपरोधिक पोस्टर्समुळे विशेष प्रसिद्धी मिळाली. या पोस्टर्समधून विद्यार्थ्यांनी शिक्षण व्यवस्था, पेपरफुटी, बेरोजगारी आणि तरुणांच्या प्रश्नांवर प्रभावीपणे भाष्य केले.
आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांनी विविध मागण्यांसाठी सरकारवर दबाव निर्माण केला. या आंदोलनातील वैशिष्ट्यपूर्ण पोस्टर्सची सर्वत्र चर्चा झाली होती. त्याच पोस्टर्सचे संकलन करून हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
२ ऑक्टोबर रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहणार आहे. विद्यार्थी, युवक, काँग्रेस कार्यकर्ते, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी तसेच सर्वसामान्य नागरिकांनी या प्रदर्शनाला आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन आयोजक युवराज मोहिते यांनी केले आहे.