मुंबई : काँग्रेसचे नवनियुक्त प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद हे उद्या गुरुवार दिनांक १ ऑक्टोबरपासून पाच दिवसांच्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. गुरुवारी सकाळी त्यांचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे आमगन होईल, त्यानंतर ते शिवाजी पार्क येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करतील, दुपारी १२.१५ वाजता दादर येथील चैत्यभूमीवर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून दुपारी १.०० वाजता टिळक भवन (MPCC मुख्यालय) येथे त्यांचे आगमन होईल.

पाच दिवसांच्या या दौऱ्यात डॉ. प्रसाद आपला पदभार स्विकारतील, प्रदेश काँग्रेसच्या विस्तारित कार्यकारिणीची बैठक होईल तसेच जिल्हाध्यक्षांशी संवाद साधतील. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह राज्यातील ज्येष्ठ नेते, आमदार खासदार यांच्याशी ते चर्चा करणार आहेत.

दि. २ ऑक्टोबर गांधी जयंती दिनी ते मणी भवनला भेट देणार आहेत, त्यानंतर शांती आश्रम येथील सर्वोदय मंडळाच्या कार्यक्रमास उपस्थित राहतील. दुपारी २.०० वाजता प्रदेश काँग्रेसच्या विविध विभाग आणि आघाड्यांच्या राज्य प्रमुखांशी/अध्यक्षांशी बैठक आयोजित करण्यात आली आहे. सायंकाळी ४.३० वाजता डॉ. प्रसाद प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांशी वैयक्तिक भेटतील.

दिनांक ३ ऑक्टोबर रोजी डॉ. प्रसाद मुंबई काँग्रेस कार्यालयाला भेट देऊन विविध बैठकांना संबोधित करतील.

रविवार, दिनांक ४ ऑक्टोबर रोजी टिळक भवन येथे प्रदेश काँग्रेसच्या मीडिया, सोशल मीडिया आणि ‘ट्रेनिंग अँड कनेक्ट सेंटर’ च्या टीमसोबत बैठक आयोजित करण्यात आली आहे.
संध्याकाळी प्रदेशाध्यक्ष व मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष, विधिमंडळ पक्ष आणि विधान परिषदेतील नेते, राज्याशी संबंधित AICC सचिव आणि प्रदेश काँग्रेस व मुंबई काँग्रेसचे संघटन महासचिव यांच्यासोबत बैठक आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती प्रदेश काँग्रेसने दिली आहे.