खेड : तालुक्यातील शेतकऱ्यांवर ओढावलेल्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर खेड तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा, अशी मागणी शिवसेना उपनेते तथा आमदार श्री. संजय वसंतराव कदम यांनी केली आहे. याबाबत त्यांनी खेडचे उपविभागीय अधिकारी यांची भेट घेऊन शासनाच्या निदर्शनास आणण्यासाठी निवेदन सादर केले.
यंदाच्या पावसाळ्यात पावसाच्या वितरणात झालेली अनियमितता, काही कालावधीत पडलेला पावसाचा खंड आणि त्याचा शेती पिकांवर झालेला परिणाम यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांसमोर अडचणी निर्माण झाल्याचे निवेदनातून निदर्शनास आणून देण्यात आले. विशेषतः पिकांच्या वाढीच्या महत्त्वाच्या टप्प्यावर पावसाचा अपेक्षित लाभ न झाल्याने शेती उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन शासनाने तातडीने वस्तुनिष्ठ पिकपाहणी व दुष्काळसदृश परिस्थितीचे मूल्यांकन करावे, तसेच निकषांनुसार खेड तालुका दुष्काळग्रस्त अथवा दुष्काळसदृश परिस्थितीग्रस्त घोषित करण्याबाबत आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी आमदार संजय कदम यांनी केली. दुष्काळग्रस्त परिस्थिती घोषित झाल्यास शासनाच्या प्रचलित निकषांनुसार शेतकऱ्यांना उपलब्ध होणाऱ्या विविध सवलती व मदतीचा विचार होऊ शकतो. त्यामुळे प्रशासनाने तालुक्यातील शेती परिस्थितीचा गांभीर्याने आढावा घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आवश्यक प्रस्ताव शासनाकडे पाठवावा, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली. यावेळी सांगोला- चिकमोद जिल्हा परिषद सदस्य श्री. दादासाहेब लवटे, उद्योजक श्री. विकी धोंगडे, उद्योजक श्री. सतुशेठ कदम, माजी नगरसेवक श्री. अजयशेठ माने, उद्योजक श्री. समीर खेडेकर आणि उद्योजक श्री. सुनील निकम उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या अडचणी प्रशासनाच्या माध्यमातून शासनापर्यंत पोहोचवून त्यावर तातडीने उपाययोजना करण्यासाठी पाठपुरावा केला जाईल, अशी भूमिका यावेळी उपस्थितांकडून व्यक्त करण्यात आली.
खेड तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; माजी आमदार संजय कदम यांचे प्रांतअधिकाऱ्यांना निवेदन!
