पेण : पेण तालुक्यातील तरणखोप ग्रापंचायतीचे रहिवाशी तसेच शेतकरी असलेले कैलास महादेव पाटील यांच्या जमिनीवर अतिक्रमण आणि पाणीपुरवठा बंद केल्याच्या मुद्द्यावर तहसीलदारांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.

शेतीजवळ बेकायदेशीरपणे जमीन भराव केला असून पाण्याची पाईपलाईन तोडून टाकण्यात आली आहे. यामुळे शेतीसाठी पाणीपुरवठा पूर्णत बंद झाला असून शेती उत्पन्न बुडाले असल्याने तसेच अनेक वेळा तक्रार करून ही शासकीय अधिकारी लक्ष देत नसल्याने आज सोमवार रोजी कैलास पाटील यांनी आपल्या जागेतून बेकायदेशीर चालू असलेला येण्या जाण्याचा मार्ग बंद करून शासनाचे व ग्रामपंचायतीचे लक्ष वेधले आहे.जो पर्यंत न्याय मिळत नाही तो पर्यंत रस्ता बंद ठेवण्याचा इशारा यावेळी कैलास पाटील यांनी दिला आहे.

याबाबत तहसीलदार तानाजी शेजाळ यांच्या कडून माहिती घेतली असता त्यांनी सांगितले की राधाकृष्ण वाडीत राहणारे कैलास पाटील यांचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी पाण्याची पाईप लाइन टाकण्याची परवानगी देण्यात आली आहे तरी काही अडचण निर्माण होत असेल तर त्यांनी पोलिस बंदोबस्त घ्यावा असे सांगण्यात आले आहे.