खेड : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील सात्विनगाव- दाभिळ नाका परिसरातून २१ वर्षीय विवाहित महिला घरातून कोणालाही न सांगता निघून गेल्यानंतर परत न आल्याने, त्यांच्या पतीने दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सौ. सिंधुरा सचिन कनकुटे, रा. सात्विनगाव, दाभिळ नाका, ता. खेड, जि. रत्नागिरी या २१ वर्षीय विवाहित महिला २८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ६.१५ वाजण्याच्या दरम्यान घरातून कोणालाही न सांगता निघून गेल्या. त्यानंतर त्या घरी परतल्या नसल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी त्यांचे पती सचिन भगवान कनकुटे (वय २८) यांनी खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार अज्ञात इसमाने सिंधुरा कनकुटे यांचे अपहरण केल्याच्या संशयावरून गुन्हा रजिस्टर क्रमांक ३२७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १४०(३) व भादंवि कलम ३६५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महिला नेमक्या कोणत्या परिस्थितीत घरातून निघून गेल्या, त्यांच्याशी कोणाचा संपर्क झाला होता तसेच त्या सध्या कुठे आहेत, याबाबत पोलीस तपास करीत आहेत. पोलीस निरीक्षक विवेक अहिर यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.