खेड : डॉ. के. एच. घरडा स्मृती सप्ताहानिमित्त घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट, लवेल आणि परशुराम एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्थापत्य अभियांत्रिकीची ओळख : शालेय विद्यार्थ्यांसाठी प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण’ हा विशेष शैक्षणिक उपक्रम युनायटेड इंग्लिश स्कूल, चिपळूण येथे आयोजित करण्यात आला.
शालेय विद्यार्थ्यांमध्ये स्थापत्य अभियांत्रिकीविषयी कुतूहल निर्माण करणे, विज्ञान व अभियांत्रिकीतील विविध संकल्पना प्रत्यक्ष प्रयोगांच्या माध्यमातून समजावून सांगणे आणि भविष्यातील करिअरच्या संधींची ओळख करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. कार्यक्रमात स्थापत्य अभियांत्रिकीच्या विविध शाखांशी संबंधित प्रत्यक्ष प्रयोग विद्यार्थ्यांना करून दाखविण्यात आले. काँक्रीट तंत्रज्ञान विभागात रिबाऊंड हॅमर चाचणी तसेच बांधकाम साहित्यामधील गाळाचे प्रमाण निश्चित करण्याची पद्धत विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आली. भू-तांत्रिक अभियांत्रिकी विभागात मातीची द्रव मर्यादा, प्लास्टिक मर्यादा आणि चाळणी विश्लेषणाच्या माध्यमातून मातीच्या कणांच्या आकारमानाचे वितरण कसे निश्चित केले जाते, याचे प्रात्यक्षिक देण्यात आले. पर्यावरण अभियांत्रिकी विभागात पाण्यातील एकूण विरघळलेल्या घन पदार्थांचे (TDS) प्रमाण मोजण्याची पद्धत तसेच ध्वनी पातळी मापकाच्या साहाय्याने परिसरातील ध्वनी प्रदूषणाची पातळी मोजण्याचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. तर सर्वेक्षण अभियांत्रिकी विभागात ऑटो लेव्हल आणि चुंबकीय होकायंत्राच्या साहाय्याने भूमापनातील मूलभूत तत्त्वांची विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष ओळख करून देण्यात आली. कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले ते ‘खनिज आणि खडकांचे अद्भुत विश्व’ या खनिज व खडकांच्या प्रदर्शनाचे. या प्रदर्शनातून विद्यार्थ्यांना विविध प्रकारची खनिजे व खडक, त्यांची वैशिष्ट्ये आणि दैनंदिन जीवनातील त्यांचे महत्त्व समजून घेता आले.
खडकांची निर्मिती कशी होते, त्यांचे प्रकार कोणते आणि बांधकाम क्षेत्रात त्यांचा कशाप्रकारे उपयोग केला जातो, याची माहिती विद्यार्थ्यांना रंजक पद्धतीने देण्यात आली.
पुस्तकी ज्ञानासोबतच प्रत्यक्ष प्रयोग आणि निरीक्षणातून शिक्षण मिळाल्यास विद्यार्थ्यांच्या संकल्पना अधिक स्पष्ट होतात, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. ‘शिका, पाहा आणि करून पाहा’ या संकल्पनेवर आधारित या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, निरीक्षणक्षमता आणि अभियांत्रिकीविषयी जिज्ञासा निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
या उपक्रमाचे आयोजन घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंटच्या स्थापत्य अभियांत्रिकी विभागातील सिव्हिल इंजिनिअरिंग स्टुडंट फोरम (CASTLE) यांच्या वतीने करण्यात आले. शालेय विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून अभियांत्रिकीची ओळख करून देणारा हा उपक्रम भविष्यातील अभियंत्यांच्या जडणघडणीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरला.