चिपळूण: तालुक्यातील मांडकी खांबेवाडी येथे दोन बंद घरांचे कोयंडे व कुलूप हत्याराने तोडून घरात प्रवेश करत अज्ञात चोरट्यांनी चांदीचे दागिने आणि रोख रकमेसह एकूण ३६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लांबवल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी चिपळूण पोलिसांत अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रमेश काशिनाथ पवार (वय ६५, व्यवसाय: सेवानिवृत्त, सध्या रा. करार व्हिलेज, मालाड पूर्व, मुंबई; मूळ रा. मांडकी खांबेवाडी, ता. चिपळूण) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा चोरीचा प्रकार २२ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६:३० वाजेपासून ते ३० ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजेच्या दरम्यान घडला. फिर्यादी रमेश पवार यांचे मांडकी खांबेवाडी येथील घर बंद होते. याच कालावधीत अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराच्या दरवाजाचा कोयडा कोणत्याही हत्याराने तोडून आत प्रवेश केला. घरातील कपाटात ठेवलेले चांदीचे विविध दागिने आणि रोख रक्कम चोरट्याने लांबवली. तसेच, फिर्यादींचे शेजारी राहणारे संतोष नथुराम निमनकर यांच्याही बंद घराचा कडी-कोयडा व कुलूप हत्याराने तोडून अज्ञात चोरट्याने घरातील कपाटातील रोख रक्कम चोरून नेली.
या प्रकरणी ३१ ऑक्टोबर रोजी दुपारी १:२६ वाजता चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद क्रमांक १४५/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०५ (अ), ३३१(३), ३३१(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बंद घरांना लक्ष्य करून झालेल्या या चोरीमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, पोलीस अज्ञात चोरट्याचा शोध घेत आहेत.