मुंबई -काही अदृश्य शक्तींकडून दिल्लीतील भेटीला अनावश्यक राजकीय रंग देऊन आणि अशा बातम्या पेरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत मतभेद आहेत, नेतृत्वामध्ये समन्वय नाही, असे कृत्रिम कथानक निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला असून हा निव्वळ खोडसाळपणा आहे असा स्पष्ट खुलासा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी केला आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या आजच्या दिल्लीतील भेटीला अनावश्यक राजकीय रंग देण्यात आला आहे. यापूर्वी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि खासदार पार्थ पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन स्वर्गीय अजितदादांच्या निधनानंतर पक्षासमोरील विविध प्रश्नांबाबत सविस्तर चर्चा केली होती. विशेष म्हणजे, त्याच भेटीदरम्यान सुनेत्रा पवार यांनी स्वतः पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांचे एक शिष्टमंडळ आपली भेट घेणार असल्याची कल्पना अमित शाह यांना दिली होती आणि त्यासाठी वेळ उपलब्ध करून देण्याची विनंतीही केली होती असेही उमेश पाटील यांनी सांगितले.
स्वर्गीय अजितदादांच्या कार्यकाळातील काही महत्त्वाचे विषय, राज्याच्या हिताचे प्रश्न आणि पक्षाशी संबंधित विविध बाबींची या ज्येष्ठ नेत्यांना सखोल माहिती आहे. त्याच अनुषंगाने आजची ही पूर्वनियोजित, औपचारिक भेट झाली हेही उमेश पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
याशिवाय या भेटीदरम्यान संबंधित नेत्यांनी आपापल्या मतदारसंघांतील विविध प्रश्न मांडले. तसेच महायुतीतील मित्रपक्षांच्या नेत्यांमध्ये स्वाभाविकपणे होणारी अनौपचारिक चर्चा आणि विचारांची देवाणघेवाणही झाली.मात्र, राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार आणि खासदार पार्थ पवार यांना डावलून ही भेट झाल्याच्या बातम्या पूर्णतः चुकीच्या, तथ्यहीन आणि दिशाभूल करणाऱ्या आहेत असेही उमेश पाटील यांनी ठणकावून सांगितले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महायुतीचा महत्त्वाचा घटक असून आमचा पक्ष राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या खंबीर नेतृत्वाखाली एकसंघ आणि एकदिलाने कार्यरत आहे. माध्यमांनी बातम्या प्रसिद्ध करताना वस्तुस्थितीची खातरजमा करावी. केवळ तर्कवितर्कांच्या आधारे पक्षातंर्गत संघर्षाचे चित्र रंगविणे योग्य नाही असा सल्लाही उमेश पाटील यांनी दिला आहे.
मित्रपक्षांच्या नेत्यांमधील औपचारिक भेटीचे राजकारण करू नका. पेरलेल्या बातम्या आणि प्रत्यक्ष वस्तुस्थिती यातील फरक समजून घ्या.. ! हेही आवर्जून उमेश पाटील यांनी माध्यमांना सांगितले आहे.