चिपळूण : आठ दिवसांतच राष्ट्रीय महामार्ग विभागाने कुंभार्ली घाटातील रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू केले आहे. मनसेचे वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष राजू खेतले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सज्जड दम दिल्यानंतर सुस्तावलेली यंत्रणा भानावर आली असून, कामाला सुरुवात झाली आहे.

अत्यंत महत्त्वाचा असलेल्या कुंभार्ली घाटातील अवघड वळणांच्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले होते. त्यामुळे छोट्या चारचाकी वाहनांना या ठिकाणाहून ये-जा करताना मोठी कसरत करावी लागत होती. या रस्त्याच्या कामाचा ठेका घेतलेल्या परजिल्ह्यातील ठेकेदाराने खड्डे भरण्याऐवजी संरक्षण भिंती बांधण्यास सुरुवात केली होती. प्रवासी आणि वाहनचालकांनी अनेक वेळा मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. ठेकेदार मात्र सर्वत्र संरक्षण भिंती उभारत राहिला; परंतु रस्त्यावरील खड्ड्यांकडे पूर्णतः दुर्लक्ष करण्यात आले.

मनसे वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष राजू खेतले यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी आठ दिवसांपूर्वी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे उपअभियंता श्री. पाटील यांची भेट घेतली होती. यावेळी आठ दिवसांत खड्डे भरले गेले नाहीत, तर ठेकेदाराला काम करू देणार नाही. त्याचबरोबर आपल्या कार्यालयातही काम करणे अवघड होईल, असा इशारा त्यांनी दिला होता. त्यानुसार संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी ठेकेदाराला सक्त ताकीद देऊन खड्ड्यांची तत्काळ दुरुस्ती करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार आजपासून खड्डे भरण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

त्यामुळे या संदर्भातील आंदोलन स्थगित करण्यात आले असून, मनसेचे वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष राजू खेतले यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी श्री. पाटील यांचे आभार व्यक्त केले आहेत.

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र यांना जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग आहे. मात्र, या मार्गाकडे संबंधित यंत्रणा नेहमीच दुर्लक्ष करीत असतात. त्यामुळे हा रस्ता नेहमीच धोकादायक बनत असतो. यामुळे रस्त्याच्या कामाच्या दर्जाकडे संबंधित यंत्रणेने गांभीर्याने लक्ष देऊन काम करून घ्यावे, अशी विनंतीही राजू खेतले यांनी केली आहे.