चिपळूण : पिंपळी खुर्द, ता. चिपळूण येथील वाशिष्ठी डेअरी या दुग्धप्रकल्पाला पुणदी, ता. तासगाव येथील अग्रणी फूड्सचे व्हाईस चेअरमन दिनकरराव बिले आणि संचालक लक्ष्मण पाटील यांनी सदिच्छा भेट देत डेअरीच्या विविध कामकाजाची माहिती जाणून घेतली. या भेटीदरम्यान दुग्धसंकलन, प्रक्रिया, उत्पादनाची गुणवत्ता तसेच डेअरीच्या एकूण कार्यपद्धतीची पाहणी करण्यात आली.

वाशिष्ठी डेअरीच्या मुख्य प्रवर्तक सौ. स्वप्ना यादव यांनी अग्रणी फूड्सच्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले. यावेळी त्यांनी वाशिष्ठी डेअरीच्या स्थापनेमागील उद्देश, दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून शेतकरी व दूध उत्पादकांना उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या सुविधा तसेच डेअरीच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची सविस्तर माहिती दिली.

भेटीदरम्यान अग्रणी फूड्सचे व्हाईस चेअरमन दिनकरराव बिले व संचालक लक्ष्मण पाटील यांनी डेअरीच्या विविध विभागांची माहिती घेतली. दूध संकलनापासून ते त्यावर करण्यात येणारी प्रक्रिया, उत्पादनाची गुणवत्ता, व्यवस्थापनाची पद्धत तसेच बाजारपेठेतील वितरण व्यवस्थेबाबत त्यांनी जाणून घेतले. आधुनिक पद्धतीने दुग्ध व्यवसायाला चालना देताना शेतकऱ्यांच्या सहभागाला महत्त्व देण्याच्या वाशिष्ठी डेअरीच्या कार्यपद्धतीची त्यांनी माहिती घेतली.

यावेळी दोन्ही संस्थांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये दुग्ध व्यवसायातील बदलते तंत्रज्ञान, उत्पादनाची गुणवत्ता, बाजारपेठेतील संधी आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांना अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने विविध विषयांवर चर्चा झाली. अशा प्रकारच्या भेटींमुळे दुग्ध व्यवसायातील अनुभवांची देवाणघेवाण होऊन भविष्यातील सहकार्याच्या नव्या शक्यता निर्माण होण्यास मदत होऊ शकते.

याप्रसंगी वाशिष्ठी डेअरीचे मुख्य व्यवस्थापक लक्ष्मण खरात, डेअरी मॅनेजर अनुप बनकर, मार्केटिंग मॅनेजर राजदीप पाटील तसेच डेअरीचे कर्मचारी उपस्थित होते. अग्रणी फूड्सच्या पदाधिकाऱ्यांनी प्रकल्पाच्या कार्यपद्धतीची माहिती घेतल्यानंतर वाशिष्ठी डेअरीच्या उपक्रमांचे कौतुक केले.