मंडणगड : चिपळूण तालुक्यातील ढोक्रवली येथील अंगणवाडीत बालकांना फळवाटप करून त्यांच्या आरोग्य व पोषणाबाबत जनजागृती करण्यात आली. यावेळी अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या कार्याचा गौरव करत त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

भाजपा अनुसूचित जाती मोर्चा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष मंगेश मोहिते, भाजपा चिपळूण तालुका पश्चिम ग्रामीण तालुकाध्यक्षा वैष्णवी राजे शिर्के आणि भाजपा ओबीसी सेल उत्तर रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष गणपत गावकर यांच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

यावेळी अंगणवाडीतील बालकांना फळांचे वाटप करून सकस आहार, आरोग्य आणि पोषणाचे महत्त्व सांगण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी बालकांशी आपुलकीने संवाद साधत त्यांच्या दैनंदिन जीवनातील विविध विषयांवर चर्चा केली.

यावेळी मंगेश मोहिते यांनी बालकांना मार्गदर्शन करत त्यांच्या आरोग्यपूर्ण वाढीसाठी कुटुंब, अंगणवाडी आणि समाजाची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगितले. तसेच निवृत्त शेड अधीक्षक, मुंबई पोर्ट ट्रस्ट सुनील मोहिते यांनी बाल संगोपन, आरोग्य, शिस्त आणि योग्य संस्कार याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले.

अंगणवाडीतील बालकांच्या संगोपनासाठी सातत्याने कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविका शितल राणीम व पूर्वी गावकर यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. त्यांच्या कार्याबद्दल उपस्थितांनी कौतुक व्यक्त केले.

कार्यक्रमाला माजी सरपंच सलोनी गावकर, ग्रामविकास अधिकारी निलकंठ रुपनर, कृष्णा मोहिते, गणपत राणे यांच्यासह अंगणवाडीतील बालके, पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.