विलवडे (प्रतिनिधी:सागर गोवळे) : गेल्या १५ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या विविध समस्या आणि रास्त मागण्यांकडे रेल्वे प्रशासनाकडून होणाऱ्या दुर्लक्षामुळे, येत्या २० सप्टेंबर रोजी विलवडे रेल्वे स्थानकावर भव्य लाक्षणिक उपोषण छेडण्यात येणार आहे. ‘विलवडे रेल्वे स्थानक प्रवासी संघटना’ (मुंबई व ग्रामीण) यांच्या वतीने या उपोषणाची जय्यत तयारी सुरू असून, लांजा तालुका पूर्व भाग आणि राजापूर तालुक्यातील संबंधित गावांतील नागरिक मोठ्या संख्येने एकत्र आले आहेत.
मुंबईतील नोकरदार आणि स्थानिक ग्रामस्थ या उपोषणासाठी विशेष मेहनत घेत असून जागोजागी पोस्टर्स लावून जनजागृती केली जात आहे. उपोषणाला ५०० हून अधिक नागरिक उपस्थित राहण्याचा अंदाज आहे. प्रशासकीय परवानग्या, पार्किंग आणि लाऊडस्पीकरच्या परवानग्यांसाठी कार्यकर्त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. हे आंदोलन पूर्णपणे शांततेत आणि कायदा-सुव्यवस्थेचा भंग होणार नाही या पद्धतीने केले जाईल, असे आयोजकांनी स्पष्ट केले आहे. मात्र, या शांततापूर्ण आंदोलनाची रेल्वे प्रशासनाने दखल न घेतल्यास नोव्हेंबर महिन्यात ‘रेल रोको’सारखे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
प्रवासी संघटनेच्या प्रमुख मागण्या:
महत्त्वाच्या गाड्यांना थांबा: जनशताब्दी, नेत्रावती, मत्स्यगंधा, मांडवी आणि कोचीवेली एक्सप्रेस गाड्यांना विलवडे स्थानकावर थांबा मिळावा.
दुसरा फलाट व पदचारी पूल (Over Bridge): सध्या एकच फलाट असल्याने दुसऱ्या रुळावर गाडी उभी राहिल्यास महिला, बालके व वृद्धांना होणारा त्रास टाळण्यासाठी दुसऱ्या फलाटाची आणि जोडणाऱ्या ओव्हर ब्रिजची निर्मिती व्हावी.
आरक्षण कोटा: कोरोनापूर्वीप्रमाणे कोकण कन्या, दिवा पॅसेंजर आणि तुतारी एक्सप्रेसचा आरक्षण कोटा पूर्ववत सुरू करावा.
स्थानक सुविधांचा विस्तार:
फलाटावर सुसज्ज वेटिंग रूमची निर्मिती.
अपंगांसाठी लिफ्टची सोय आणि ज्येष्ठांसाठी अडथळामुक्त, प्रकाशमय मार्ग.
मुख्य रस्त्यापासून स्थानकापर्यंतच्या रस्त्याचे रुंदीकरण आणि सिमेंट काँक्रीटीकरण.
रस्त्यावरील नादुरुस्त पथदीप कायमस्वरूपी दुरुस्त करणे.
स्वच्छता आणि सुरक्षितता: स्थानक परिसराची नियमित स्वच्छता, उघड्या शोचालय टँकची दुरुस्ती आणि रिक्षाचालकांसाठी सुसज्ज शेड.
इतर मागण्या:
स्थानकावर कोकण रेल्वेचे जनक प्रा. मधु दंडवते यांचे तैलचित्र लावण्यास परवानगी.
खेड-सावंतवाडी लोकल ट्रेन सुरू करणे आणि सावंतवाडी टर्मिनस पूर्ण क्षमतेने चालवणे.
लोकप्रतिनिधी आणि लोकनेत्यांनी वारंवार पत्रव्यवहार करूनही रेल्वे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने हा नाईलाजास्तव आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागत असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले. २० सप्टेंबरच्या या लाक्षणिक उपोषणाला जिल्ह्यातील प्रतिष्ठित मान्यवरांनी तसेच लांजा-राजापूर तालुक्यातील जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहून पाठिंबा द्यावा, असे आवाहन विलवडे रेल्वे स्थानक प्रवासी संघटनेने केले आहे.
विलवडे रेल्वे स्थानकावर २० सप्टेंबरला लाक्षणिक उपोषण; मागण्या मान्य न झाल्यास नोव्हेंबरमध्ये ‘रेल रोको’चा इशारा..
