पुणे : पुण्यात सुरू असलेल्या एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला राजकीय नेत्यांसह विविध स्तरांतून पाठिंबा मिळत आहे. आमदार रोहित पवार यांनी आंदोलनस्थळी उपस्थित राहत विद्यार्थ्यांच्या मागण्यांवरून सरकारवर प्रश्न उपस्थित केले.

हे आंदोलन विद्यार्थ्यांचे असून, अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी मान्य करायची असेल तर सत्ताधाऱ्यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे जाऊन निर्णय घ्यावा, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे. सोमवारपर्यंत थांबण्याची गरज काय, आज किंवा उद्यापर्यंतच अध्यक्षांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.

दरम्यान, आंदोलनात दररोज मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी होत असून आंदोलनाला वाढता पाठिंबा मिळत असल्याचा दावा रोहित पवार यांनी केला. विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य झाल्यास विद्यार्थ्यांसोबत मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार करू, असेही त्यांनी सांगितले.

इथे सगळे विद्यार्थ्यांना पाठिंबा द्यायला आले आहेत. हे आंदोलन विद्यार्थ्यांचं आहे. अध्यक्षांचा राजीनामा ही विद्यार्थ्यांची मागणी आहे. सत्ताधारी जर म्हणत असतील की अध्यक्षांचा राजीनामा झाला पाहिजे, तर इथे येण्याची गरज काय? थेट मुख्यमंत्र्यांकडे जा आणि अध्यक्षांचा राजीनामा घेऊन या.

तुम्ही विद्यार्थ्यांना सांगता की सोमवारी पुन्हा आपण जाऊ. मुख्यमंत्र्यांच्या एवढे जवळ असाल, तर थेट राजीनामा घ्यायला लावा आणि विषय संपवा. अध्यक्षांचा राजीनामा लवकरात लवकर झाला पाहिजे, एवढीच आमची भूमिका आहे.

त्यांना असं वाटतंय की वेगळं आंदोलन केलं तर कुठेतरी विभाजन होईल. नेते आले की गर्दी होते; पण नेते गेल्यानंतर किती लोक राहतात, हेही पाहायला हवं. कारण आंदोलनासाठी प्रामाणिकता लागते.

अध्यक्षांचा राजीनामा घ्यायचाच आहे, तर सोमवारपर्यंत थांबू नका. आज रात्री किंवा उद्या सकाळपर्यंत राजीनामा घ्या. दररोज मोठ्या प्रमाणात विद्यार्थी येथे येत आहेत आणि हे आंदोलन मोठं होत चाललं आहे.

इथे आणि तिथे विद्यार्थ्यांच्या त्याच मागण्या आहेत. कुठेही बसा, पण विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्ण करा, एवढंच आमचं म्हणणं आहे.

विद्यार्थ्यांची मागणी आहे की अध्यक्ष बदलला पाहिजे. तुकाराम मुंढे यांच्यासारखा अध्यक्ष तिथे आला, तर पारदर्शकता येईल. जोपर्यंत प्रमुख अधिकारी चांगला येत नाही, तोपर्यंत हे विषय मार्गी लागणार नाहीत.

जर दररोज नवीन पुरावे समोर येत असतील, तर अध्यक्षांनी घरी जावं. त्यांचं पुनर्वसन खासदार-आमदार म्हणून त्यांचे मित्र करतील. मात्र, इथे स्वच्छ प्रतिमेचा अध्यक्ष आणून संपूर्ण व्यवस्था सुरळीत करण्याची गरज आहे.

आदित्य ठाकरे आणि संजय राऊत येणार आहेत. ते आज येतील की उद्या, हे त्यांच्याशी संपर्क झाल्यानंतर समजेल. या ठिकाणी शेतकरी नेते, सामाजिक नेते आणि राजकीय नेते आले आहेत. विद्यार्थ्यांना मिळणारा पाठिंबा वाढत आहे.

विद्यार्थ्यांनी केलेल्या मागण्या स्वीकारण्याची सुरुवात सरकारकडून झाली आहे. अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणीही पूर्ण होईल, असा आम्हाला विश्वास आहे.

सकाळी सुप्रिया सुळे आल्या होत्या. त्यांनी मुख्यमंत्र्यांशी दूरध्वनीवरून संवाद साधला. त्यांच्या दूरध्वनीवरून काही विद्यार्थीही मुख्यमंत्र्यांशी बोलले. विद्यार्थ्यांनी आपली मागणी ठाम असल्याचं मुख्यमंत्र्यांना सांगितलं आहे.विद्यार्थ्यांची मागणी पूर्ण झाली, तर आम्ही विद्यार्थ्यांसोबत मुख्यमंत्र्यांकडे जाऊ आणि त्यांचा सत्कार करू.