लांजा : खरीप हंगाम २०२६ मधील दुष्काळामुळे झालेल्या शेती व फळपिकांच्या नुकसानीचे शेतकरीनिहाय पंचनामे करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, एकही पात्र शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहू नये, यासाठी गावागावातील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना आवश्यक सहकार्य करावे, असे आवाहन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) लांजा तालुकाप्रमुख युवराज हांदे यांनी केले आहे.

लांजा तालुक्यातील खरीप पिकांच्या नुकसानीचे संयुक्त पंचनामे करण्यासाठी ग्राम महसूल अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांची पथके नियुक्त करण्यात आली आहेत. पंचनाम्यादरम्यान पिकांची प्रत्यक्ष स्थिती, क्षेत्र, छायाचित्रे, GPS नोंद तसेच शेतकऱ्याची आवश्यक वैयक्तिक व बँक खात्याची माहिती अचूकपणे नोंदविणे आवश्यक आहे.

लांजा तालुक्याचा दुष्काळी यादीत समावेश व्हावा, यासाठी शिवसेनेच्या वतीने करण्यात आलेल्या मागणीनंतर शासनाने पंचनाम्याची कार्यवाही सुरू केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी नियुक्त पथकांना सहकार्य करून आपला पंचनामा, आवश्यक हमीपत्र अथवा संमतीपत्र वेळेत पूर्ण करून घ्यावे, तसेच कोणताही शेतकरी प्रक्रियेतून वंचित राहणार नाही याची पदाधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन हांदे यांनी केले आहे.