खेड : तालुक्यातील कातळ आणि वरकस जमिनीत पाण्याचा निचरा वेगाने होत असल्याने यंदा पावसाची ओढ शेतकऱ्यांसाठी भीषण संकट ठरली आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात आवश्यक पावसाने दडी मारल्याने भाताच्या लोंब्या भरण्यापूर्वीच पिके करपून गेली असून, उत्पादनात ५० टक्क्यांहून अधिक घट होण्याची भीती व्यक्त होत आहे. हळवी आणि गरवी अशा दोन्ही प्रकारच्या भात पिकांवर पावसाअभावी संकट ओढवले आहे.
खेड तालुक्यात दरवर्षी साधारण ६ हजार ते ६ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर भाताची लागवड केली जाते. यंदा तालुक्यात सरासरी पर्जन्यमान सुमारे ३,०९९ मिलिमीटर असल्याचे सांगण्यात येत आहे. सप्टेंबर अखेरपर्यंत वार्षिक सरासरीच्या सुमारे ८५ ते ९० टक्के पावसाची नोंद झाली असली, तरी भाताच्या वाढीच्या आणि लोंब्या भरण्याच्या निर्णायक कालावधीत पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने यावेळी पारंपरिक पद्धतीने केवळ कार्यालयात बसून नोंदी न घेता थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी सुरू केली आहे. तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक यांच्या संयुक्त सहभागातून विविध गावांमध्ये युद्धपातळीवर पंचनामे करण्यात येत असल्याची माहिती आहे. दरवर्षी अतिवृष्टीची चिंता असते; मात्र यंदा पाण्याअभावी भाताचे पीक डोळ्यांदेखत वाळून जाण्याची वेळ आली, अशी व्यथा स्थानिक शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.पंचनाम्यांची प्रक्रिया वेळेत पूर्ण करून केवळ कागदी कारवाईपुरती ती मर्यादित न ठेवता प्रत्यक्ष आर्थिक मदत आणि नुकसानभरपाई दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करावी, अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांकडून जोर धरत आहे.
यंदाच्या पावसाच्या ओढीने भातशेतीचे मोठे नुकसान झाल्याने प्रशासनाच्या पंचनाम्यांमध्ये प्रत्यक्ष नुकसानीचे वास्तव कितपत प्रतिबिंबित होते आणि शेतकऱ्यांना मदत कधी मिळते, याकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.