संगमेश्वर : तालुक्यातील कातुर्डी कोंड मधली वाडीच्या विकासाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल पडले. ग्रामस्थांची अनेक दिवसांची गरज आणि मागणी लक्षात घेऊन सामाजिक सभागृहाच्या बांधकामासाठी कोयना भूकंप पुनर्वसन निधीतून रु. १५ लाखांचा निधी आमदार शेखरजी निकम यांच्या प्रयत्नातून मंजूर करण्यात आला. या सामाजिक सभागृहाच्या बांधकामाचे भूमिपूजन तसेच प्रवासी निवारा बस थांब्याचे उद्घाटन चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सन्माननीय श्री. शेखरजी निकम साहेब यांच्या हस्ते करण्यात आले.
कातुर्डी कोंड मधली वाडी येथे सामाजिक, सांस्कृतिक तसेच विविध सार्वजनिक कार्यक्रमांसाठी स्वतंत्र जागेची आवश्यकता होती. ही गरज ग्रामस्थांनी आमदार शेखर निकम यांच्याकडे मांडल्यानंतर ग्रामस्थांची मागणी आणि गावाची प्रत्यक्ष गरज लक्षात घेऊन या कामाला प्राधान्य देत निधी उपलब्ध करून देण्यासाठी आमदार निकम यांनी पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना यश येत रु. १५ लाखांचा निधी मंजूर झाला. त्यामुळे गावाच्या सार्वजनिक जीवनाला एक हक्काचे आणि उपयुक्त सामाजिक सभागृह उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
यावेळी बोलताना आमदार शेखर निकम यांनी विकासकामांविषयी आपली भूमिका स्पष्ट केली. “गावाचा विकास हा केवळ रस्ते, इमारती किंवा सुविधा उभारण्यापुरता मर्यादित नसतो; तर गावातील प्रत्येक घटकाच्या गरजा समजून घेऊन त्या पूर्ण करण्याचे काम महत्त्वाचे असते. ग्रामस्थांनी विश्वासाने आपल्यासमोर मांडलेली मागणी पूर्ण करण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करणे, हीच आपली जबाबदारी आहे,” असे त्यांनी सांगितले.
“कातुर्डी कोंड मधली वाडीच्या ग्रामस्थांनी सामाजिक सभागृहाची गरज व्यक्त केली होती. ही गरज योग्य आणि रास्त असल्याने कोयना भूकंप पुनर्वसन निधीतून रु. १५ लाखांचा निधी मंजूर करून देण्यासाठी पाठपुरावा केला. भविष्यातही गावाच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या कामांना शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू,” अशी ग्वाही आमदार निकम यांनी दिली.
दरम्यान, भाजप तालुकाध्यक्ष श्री. विनोद म्हस्के यांनी स्वखर्चातून उभारलेल्या प्रवासी निवारा बस थांब्याचे उद्घाटन यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. या सुविधेमुळे प्रवाशांना विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळणार आहे. सार्वजनिक सुविधांच्या उभारणीत लोकसहभाग आणि सामाजिक बांधिलकीचे हे काम कौतुकास्पद असल्याचे यावेळी उपस्थितांनी नमूद केले.
या प्रसंगी भाजप तालुकाध्यक्ष श्री. विनोद म्हस्के, कोकरे जिल्हा परिषद सदस्य श्री. संजय राव कदम, श्री. गौरव सुर्वे, कातुर्डी कोंड मुंबई मंडळाचे अध्यक्ष श्री. गणपत नेमाने, माजी अध्यक्ष श्री. सुरेशदादा धांगडे, शृंगारपूर ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष श्री. अनिल चव्हाण, उपाध्यक्ष श्री. गजानन मस्के, श्री. जितेंद्र तावडे, श्री. राजा म्हस्के, श्री. प्रमोद म्हस्के, श्री. रवींद्र चव्हाण, श्री. रवींद्र कुळे, श्री. राजेंद्र कुळे, श्री. गजानन चव्हाण, श्री. संतोष धांगडे, श्री. लक्ष्मण धांगडे, श्री. अरुण नेमाने, श्री. गंगाराम नेमाने, श्री. सखाराम नेमाने तसेच कातुर्डी कोंड मधली वाडीतील मुंबई, पुणे व स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गावाच्या विकासासाठी दिलेला शब्द केवळ शब्द न राहता प्रत्यक्ष विकासकामांच्या रूपाने साकार होत असल्याची भावना यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केली. सामाजिक सभागृहासाठी निधी मंजूर करून दिल्याबद्दल तसेच विकासकामांना सातत्याने प्राधान्य दिल्याबद्दल कातुर्डी कोंड मुंबई मंडळ व स्थानिक ग्रामस्थांच्या वतीने आमदार शेखरजी निकम साहेब यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले. तसेच प्रवासी निवारा व बस थांबा स्वखर्चातून उभारल्याबद्दल श्री. विनोद म्हस्के यांचेही आभार व्यक्त करण्यात आले.
