चिपळूण : संभाव्य दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जलसंधारणाला गती देऊन भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत, सन २०२६-२७ च्या ‘मिशन बंधारे अभियानांतर्गत’ ग्रामपंचायत मुंढे तर्फे चिपळूण, वरचीवाडी येथे श्रमदानातून दोन बंधारे बांधण्यात आले. जिल्हा परिषद रत्नागिरी, पंचायत समिती चिपळूण आणि ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमात ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत जलसंधारणासाठी आपले योगदान दिले.
पावसाच्या पाण्याचा योग्य विनियोग करून त्याचा साठा वाढविणे, भूजलपातळी सुधारण्यास हातभार लावणे आणि आगामी काळातील संभाव्य पाणीटंचाईची तीव्रता कमी करण्याच्या दृष्टीने अशा श्रमदान उपक्रमांना विशेष महत्त्व आहे. केवळ शासकीय यंत्रणेवर अवलंबून न राहता लोकसहभागातून जलसंधारणाची कामे उभी राहणे, ही ग्रामीण भागाच्या पाणी सुरक्षेच्या दृष्टीने सकारात्मक बाब आहे.
या उपक्रमासाठी चिपळूण पंचायत समितीचे सभापती मा. श्री. सूर्यकांत घेतले यांचे विशेष सहकार्य लाभले. यावेळी जिल्हा परिषद सदस्या सौ. नेहा रहाटे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे चिपळूण तालुकाप्रमुख श्री. बळीराम गुजर उपस्थित होते.
यावेळी माजी सरपंच श्री. मयूर खेतले, माजी उपसरपंच श्री. श्याम खेतले, ग्रामसेवक श्री. अस्वले, माजी ग्रामपंचायत सदस्य श्री. विजय मोहिते, श्री. रुपेश खेतले, श्री. प्रमोद महाडिक, श्री. सूरज खेतले, श्री. सुदेश रहाटे, ग्रामपंचायत कर्मचारी श्री. संकेत खेतले, श्री. दिलीप खेतले, श्री. बाळू गायकवाड, श्री. संजय मोरे यांच्यासह अन्य ग्रामस्थ या सर्वांच्या सक्रिय सहभागातून श्रमदानाचे महत्त्व अधोरेखित झाले.
संभाव्य दुष्काळाचे आव्हान लक्षात घेता, पाणी अडवा-पाणी जिरवा या संकल्पनेला प्रत्यक्ष कृतीची जोड देणारा हा उपक्रम इतर गावांसाठीही प्रेरणादायी ठरू शकतो. जलसंधारण ही केवळ शासनाची जबाबदारी नसून, प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थ यांच्या सामूहिक सहभागातूनच पाणीटंचाईवर दीर्घकालीन उपाययोजना प्रभावीपणे राबविता येऊ शकतात, हा संदेश मुंढे येथील श्रमदानातून उभारलेल्या बंधाऱ्याने अधोरेखित केला आहे.
