जळगाव: पुण्यात एमपीएससी विद्यार्थ्यांच्या सुरू असलेल्या आंदोलनाला मंत्री, आमदार, खासदार, कोणीही भेट देऊ नये असे फर्मान शिवसेना शिंदे गटाच्या वतीने काढण्यात आले आहे असा खळबळजनक दावा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी केला आहे. पक्षाचे सचिव संजय भाऊराव मोरे यांनी हा मेसेज सर्वत्र पाठवल्याचेही त्या म्हणाल्या.

गेल्या काही दिवसांपासून विविध मागण्यांसाठी पुण्यात एमपीएससी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. समाजातील विविध घटक व लोकप्रतिनिधी या आंदोलनाला भेट देत आपला पाठिंबा दर्शवत आहेत. मात्र आंदोलनाला मंत्री, आमदार, खासदार, कोणीही भेट देऊ नये असं अजब फर्मान शिंदेंच्या शिवसेनेने काढले असल्याचा दावा रोहिणी खडसे यांनी केला आहे.

रोहिणी खडसे याबाबत म्हणाल्या की, तिथे विद्यार्थी आपल्या न्याय हक्कासाठी लढा देत आहेत. अनेक जण उपाशीतापाशी आहेत, रात्रीची झोप विद्यार्थ्यांना माहिती नाही, प्रचंड संघर्ष करत आपल्या मागण्या सांगत आहेत आणि राज्यातील एक सत्ताधारी पक्ष अशाप्रकारे मंत्री, आमदार, खासदार यांना मेसेज देतो. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्देशून त्या म्हणाल्या की, हे काही बरोबर नाही. किमान आपल्या सारख्या संवेदनशील नेत्याच्या पक्षाकडून असे होणे अपेक्षित नव्हते.