चिपळूण : महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभाग व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या अनुदानातून प्रत्येक जिल्ह्यामध्ये साहित्य संमेलन आयोजित केले जाते. यावर्षी संमेलन आयोजनाचा मान चिपळूण मधील नुकतेच रौप्य महोत्सव साजरा केलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाला मिळाला आहे. सदर युवा साहित्य संमेलन परशुराम एज्युकेशन संस्था चिपळूण व कोकण मराठी साहित्य परिषद शाखा चिपळूण या सहयोगी संस्थेच्या सहकार्याने व चिपळूण मधील सर्व नामांकित वाचनालये, साहित्य विषयक सर्व संस्था, सर्व शाळा, शिक्षक व जिल्हाभरातील साहित्य प्रेमी यांच्या सहकार्याने १२ व १३ डिसेंबर रोजी संपन्न होणार आहे. या संमेलनाच्या निमित्ताने राज्यातील तसेच जिल्ह्यातील व्यक्ती आणि संस्थांना संपर्क करण्याच्या दृष्टीने स्वतंत्र संपर्क कार्यालयाचे उद्घाटन चिपळूण नगर परिषदेचे मुख्याधिकारी संजय जाधव व परशुराम एज्युकेशन संस्थेचे कार्याध्यक्ष मकरंद जोशी ह्या मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
चिपळूण नगरपरिषद पुरस्कृत या वाचनालयाला साहित्य संमेलन घेण्याचा मान मिळाला आहे याचा आम्हाला अभिमान वाटतो. त्याबद्दल शासनाला धन्यवाद देतो व साहित्य संमेलनासाठी नगरपरिषद प्रशासनाकडून सर्वतोपरी सहकार्य करू असे आश्वासन मुख्याधिकारी संजय जाधव यांनी दिले. सदर संमेलन चिपळूणच्या सांस्कृतिक वैभवला साजेशे होण्यासाठी चिपळूणसह परिसरातील व जिल्ह्यातील सर्व साहित्य प्रेमींनी योगदान द्यावे असे आवाहन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाचे अध्यक्ष राष्ट्रपाल सावंत यांनी केले आहे. या कार्यक्रम प्रसंगी नगर परिषदेचे प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर, वाचनालयाचे कार्याध्यक्ष सुनील खेडेकर कार्यवाह सुमेध करमरकर, कोमसाप प्रतिनिधी मनिषा दामले, वाचनालय संचालक अमित ओक, प्रदीप पवार, मंजुषा चितळे, प्राची जोशी, ग्रंथपाल, कर्मचारी वर्ग व वाचक उपस्थित होते.
