चिपळूण: मराठी-हिंदी सिने जगतातील प्रख्यात अभिनेते, समाजसेवक नाना पाटेकर यांच्या निधनाबद्दल चिपळूणचे आमदार श्री. शेखर निकम यांनी शोक व्यक्त केला.

काही दिवसांपूर्वीच म्हणजे गणपतीला नानांच्या घरी आपण दर्शनाला गेलो होतो. तेव्हा अतिशय प्रेमाने, आत्मीयतेने आणि जिव्हाळ्याने नानांनी स्वागत केले. गप्पा मारल्या,सामाजिक कार्याविषयी संवाद साधला. अगदी गळ्यात हात टाकून नाना बोलत होते. चौकशी करीत होते. चिपळूणच्या समाज जीवनाची माहिती घेत होते. त्यांच्या प्रत्येक वाक्यातून सामाजिक तळमळ प्रतीत होत होती. केवळ दुसऱ्यांसाठी जगणारे नाना आज सर्वांना अचानक सोडून निघून गेले यावर विश्वास बसायला तयार नाही. सकाळच ही दुःखद बातमी कानावर आदळली आणि अत्यंत व्याकुळ मन:स्थिती निर्माण झाली. समाजासाठी, राष्ट्रासाठी जगणारा हा अभिनेता अचानक असा सोडून जाईल यावर कसा विश्वास ठेवावा अशा शब्दात आमदार निकम यांनी आपली भावना व्यक्त केली.

नाम फाउंडेशनच्या माध्यमातून नानांचे सामाजिक कार्य सदैव स्मरणात राहील. चिपळूणच्या पूर परिस्थितीत त्यांनी दिलेला हात मोलाचा ठरला. पूरमुक्ती आणि गाळमुक्तीसाठी नानांचे योगदान महत्वपूर्ण आहे. त्यांच्या निधनामुळे मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीत फार मोठी न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. या दुःखातून सावरण्याचे त्यांच्या कुटुंबियांना बळ मिळो, अशी परमेश्वराकडे प्रार्थना करतो. आपण एक ज्येष्ठ मार्गदर्शक, सच्चा मित्र गमावला याचे मनस्वी दुःख होतंय अशा शब्दात आमदार निकम यांनी आदरांजली अर्पण केली.