मुंबई : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाची घटना अत्यंत दु:खद व मन हेलावून टाकणारी आहे. नानांनी मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये अनेक वेगवेगळ्या भूमिका साकारल्या. मात्र प्रत्येक भूमिकेत त्यांनी आपल्या अभिनयाची स्वतंत्र छाप उमटवली. आवाजातील ताकद आणि चेहऱ्यावरील भाव ही नानांच्या अभियानाची खासियत होती. ‘अंकुश’ आणि ‘पुरुष’ हे त्यांच्या अभिनय कारकिर्दीतील दोन महत्त्वाचे माईलस्टोन ठरले, अशा शब्दात भाजपा प्रदेशाध्यक्ष श्री. रविंद्र चव्हाण यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
शोकसंदेशात ते म्हणाले, रंगभूमीपासून सुरू झालेला प्रवास पुढे मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत एका मोठ्या पर्वात बदलला. ‘परिंदा’, ‘क्रांतिवीर’, ‘अग्निसाक्षी’,‘खामोशी’,‘अपहरण’,‘राजनीती’ यांसारख्या चित्रपटांमधून नानांनी विविध भूमिका तितक्याच ताकदीने साकारल्या. ‘नटसम्राट’सारख्या चित्रपटातून त्यांच्या अभिनयातील खोली पुन्हा एकदा जाणवली. त्यांच्या याच विविधांगी अभिनयासाठी तीन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि 2013 मध्ये पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले.
चित्रपटांसोबतच समाजातील सामान्य माणसाच्या प्रश्नांशी त्यांची नाळ जोडलेली होती. शेतकरी आणि गरजू कुटुंबांच्या मदतीसाठी त्यांनी ‘नाम फाउंडेशन’च्या माध्यमातून महत्त्वाचे काम केले. आपल्याला मिळालेले यश आणि प्रसिद्धी ही समाजाच्या उपयोगी पडावी, या भावनेतून नानांनी केलेले कार्य सदैव प्रेरणा देत राहील.
त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो तसेच पाटेकर कुटुंबीयांना या दु:खातून सावरण्याचे बळ मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!