लांजा: पावसाचे पाणी अडवून त्याचा भविष्यातील पाणीटंचाईच्या काळात उपयोग व्हावा तसेच भूजल पातळीत वाढ व्हावी, या उद्देशाने लांजा-कुवे ग्रामस्थ आणि लांजा नगरपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने ‘मिशन बंधारे’ उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमांतर्गत लांजा आगरवाडी येथील डोहाचा पऱ्या येथे आगरवाडी ग्रामस्थ आणि लांजा नगरपंचायतीच्या संयुक्त सहकार्याने दोन ठिकाणी बंधारे बांधण्यात आले. या बंधाऱ्यांमुळे पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवून ते परिसरातच साठविण्यास मदत होणार असून विहिरी व कूपनलिकांच्या पाणीपातळीत वाढ होण्यासही हातभार लागणार आहे.
या उपक्रमावेळी लांजा नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष सावली कुरूप, मुख्याधिकारी अभिजीत कुंभार, उपनगराध्यक्ष मिलिंद लांजेकर, पाणी सभापती रफिक नेवरेकर यांच्यासह सर्व नगरसेवक उपस्थित होते. तसेच आगरवाडीचे अध्यक्ष प्रमोद आग्रे, लांजा नगरपंचायतीचे माजी उपनगराध्यक्ष मनोहर कवचे, सुरेश बापार्डेकर, महादेव पन्हळेकर, संदीप राबाडे व राजाराम करंबेळे यांच्यासह आगरवाडीतील ग्रामस्थ आणि नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी बंधारा उभारणीच्या कामात सहभाग घेतला.
जलसंधारणासाठी लोकसहभागातून राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे पाणी अडवा, पाणी जिरवा या संकल्पनेला प्रत्यक्ष चालना मिळाली असून भविष्यात अशा प्रकारचे आणखी बंधारे उभारण्यात येतील अशी अपेक्षित आहे.
