चिपळूण : महाराष्ट्र राज्याचे शिक्षणमंत्री ना. श्री. दादासाहेब भुसे यांच्या नियोजित रत्नागिरी दौऱ्यानिमित्त ‘चला, शाळेत जाऊया’ या अभियानांतर्गत सावर्डे येथील गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयास भेट दिली.

यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीची माहिती घेतली. राज्यस्तरीय व विभागीय स्तरावरील विविध क्रीडा स्पर्धांमध्ये उल्लेखनीय विजय संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा त्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

विद्यार्थ्यांच्या या यशामागे असलेल्या त्यांच्या मेहनतीचे, शिक्षकांच्या मार्गदर्शनाचे आणि पालकांच्या प्रोत्साहनाचे त्यांनी मनापासून कौतुक केले. विद्यालयाने आजवर विविध क्षेत्रांत मिळविलेल्या गौरवास्पद यशाबद्दल शाळेचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच क्रीडा व विविध क्षेत्रांत संधी मिळाल्यास ते निश्चितच मोठी भरारी घेऊ शकतात, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

या दौऱ्याप्रसंगी चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार शिखर निकम सर, जिल्हा परिषद सदस्या पूजाताई निकम, अनिरुद्ध निकम, तसेच शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.