चिपळूण : पिंपळी–नांदिवसे मार्गावरील पिंपळी येथील तुटलेल्या पुलाचे बांधकाम सध्या सुरू असून, येत्या १५ जानेवारी २०२७ पर्यंत हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल, असे आश्वासन संबंधित अभियंते आणि ठेकेदारांनी दिले आहे. आमदार शेखर निकम यांनी या पुलाच्या बांधकामाची प्रत्यक्ष पाहणी करून कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला.
पिंपळी–नांदिवसे मार्गावरील हा पूल दसपटी विभागातील नागरिकांसाठी महत्त्वाचा आहे. पुलाचे बांधकाम सुरू असल्याने या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करून वाहतूक पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
या पार्श्वभूमीवर आमदार निकम यांनी बांधकामस्थळी भेट देऊन संबंधित अधिकारी, अभियंते आणि ठेकेदार यांच्याशी चर्चा केली. बांधकामाची सद्यःस्थिती आणि काम पूर्ण होण्याच्या कालमर्यादेबाबत त्यांनी माहिती घेतली. यावेळी एमआयडीसीच्या अभियंत्यांसह ठेकेदारांनी उपस्थित नागरिकांसमोर १५ जानेवारी २०२७ पर्यंत पूल वाहतुकीसाठी खुला करण्याचे आश्वासन दिले.
पिंपळी येथील पुलाचे बांधकाम निर्धारित वेळेत पूर्ण व्हावे, यासाठी राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी निधी उपलब्ध करून देत या कामाला प्राधान्य दिले. तसेच कामाच्या प्रगतीकडे विशेष लक्ष दिले. याबद्दल आमदार शेखर निकम यांनी पालकमंत्री उदय सामंत यांचे आभार मानले.
पुलाचे काम निर्धारित मुदतीत पूर्ण झाल्यास पिंपळी, नांदिवसे तसेच दसपटी विभागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणा दिलेल्या मुदतीत बांधकाम पूर्ण करून वाहतूक सुरू करणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
सभापती सूर्यकांत खेतले, जयद्रथ खताते, नितीन ठसाळे रमेश राणे, बाबू साळवी, दशरथ दाभोळकर, निलेश कदम, राकेश चाळके, अमित कदम, दत्ताराम सुतार, प्रकाश पालकर, बाबा साळुंखे, राजू सुतार संजय जांबुर्र्गे, मुराद अडरेकर, तनवीर खडपोलकर, विजय गजमल, हरीश गजमल,सुनील देवरुखकर ल, संजय गणवे, बाबाराम शिंदे, दत्ताराम बंगाल, अंकुश कदम, प्रबोध बापट, बाबाराम गजमल, रमेश गजमल आदी उपस्थित होते.