खेड : क्रीडा संकुल खेड येथे नुकत्याच पार पडलेल्या तालुकास्तरीय ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत रोटरी इंग्लिश मिडियम स्कूल खेडच्या खेळाडूंनी आपल्या उत्कृष्ट क्रीडाकौशल्याची चमक दाखवत घवघवीत यश संपादन केले. धावणे, उंचउडी, लांबउडी, चालणे, गोळाफेक, हातोडाफेक व भालाफेक या विविध क्रीडा प्रकारांत खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत सुवर्ण, रौप्य व कांस्य पदके पटकावली. या दमदार कामगिरीच्या जोरावर अनेक खेळाडूंची डेरवण येथील स्पोर्ट्स सेंटरमध्ये होणाऱ्या जिल्हास्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
यावेळी घेण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये १७ वर्षांखालील मुलांची १०० मीटर धावण्यात सम्यक गमरेने प्रथम, तर वेदांग चितळकरने द्वितीय क्रमांक मिळवला. २०० मीटरमध्ये सोहम टेंमकरने प्रथम, तर ४०० मीटरमध्ये कौस्तुभ बांदवलकरने प्रथम आणि राजरत्न पवारने द्वितीय क्रमांक पटकावला. ४ × १०० मीटर रिलेमध्ये वेदांग चितळकर, सम्यक गमरे, सोहम टेंमकर आणि कौस्तुभ बांदवलकर यांच्या संघाने प्रथम क्रमांक मिळवत विजेतेपदावर नाव कोरले. लांब उडीत कौस्तुभ बांदवलकर प्रथम व राजरत्न पवार तृतीय, तर उंच उडीत वेदांग चितळकरने द्वितीय क्रमांक मिळवला. गोळाफेकीमध्ये अरहान बोरोंडकरने प्रथम, भालाफेकीमध्ये सार्थक जाधवने तृतीय, तर हातोडाफेकमध्ये अरहान बोरोंडकरने तृतीय क्रमांक पटकावला.19 वर्षांखालील मुले या गटामध्ये उंच उडीत शुभम ढेबेने प्रथम, तर २०० मीटर धावण्यात द्वितीय क्रमांक मिळवला. ५ किलोमीटर चालण्याच्या स्पर्धेत मंथन बोलेने प्रथम क्रमांक पटकावला. ४०० मीटरमध्ये मकरंद गोमलेने तृतीय क्रमांक मिळवला. ४ × १०० मीटर रिलेमध्ये शुभम ढेबे, मकरंद गोमले, अथर्व दळवी, रुद्र शिरीषकर आणि मंथन बोले यांच्या संघाने द्वितीय क्रमांक मिळवला. शुभम भंडारे, तर हातोडाफेकमध्ये मोहित जोशी यांनी तृतीय क्रमांक पटकावला. 19 वर्षांखालील मुलींच्या गटात अनुष्का म्हातलेने उंच उडी आणि लांब उडी या दोन्ही प्रकारांत प्रथम क्रमांक मिळवत दुहेरी यश संपादन केले. तिच्या या उल्लेखनीय कामगिरीने स्पर्धेत विशेष लक्ष वेधून घेतले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांची डेरवण येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
वरील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना क्रीडा प्रशिक्षक सौ. शितल घाणेकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे चेअरमन श्री. उपेंद्र तलाठी, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. भूमिता पटेल, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
तालुकास्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेत रोटरी स्कूलच्या खेळाडूंचे दैदिप्यमान यश!
