चिपळूण : संगमेश्वर मतदारसंघातील मत्स्यव्यवसायाला चालना देणे, स्थानिक युवकांसाठी रोजगार निर्मिती आणि चिपळूण शहराचा पूरधोका कमी करणे, या उद्देशाने आमदार शेखर निकम यांनी मा. मत्स्यव्यवसाय मंत्री श्री. नितेशजी राणे यांच्या बैठकीत तीन महत्त्वपूर्ण विषयांचा पाठपुरावा केला.
बैठकीत मांडलेले ३ प्रमुख मुद्दे:
१. करबवणे येथे मत्स्यबीज केंद्रासाठी संपूर्ण शासकीय जमिनीची पाहणी:
मौजे करबवणे येथील हिंदुस्तान युनिलिव्हरच्या नावे असलेली १३.८९८० हेक्टर (सुमारे ३४.३ एकर) जमीन महसूल थकबाकीमुळे शासनजमा झाली आहे. यापूर्वी केवळ २ हेक्टर विचारात होते, पण संपूर्ण १३.८९ हेक्टरवर मत्स्यबीज केंद्र व रोजगारपूरक प्रकल्पाची शक्यता आमदार निकम यांनी मांडली. मंत्री महोदयांनी संपूर्ण जमिनीची पाहणी करण्याचे निर्देश दिले.
२. पिंपळी खुर्द येथील जागा हस्तांतरण:
मौजे पिंपळी खुर्द गट क्र. २१ मधील कृष्णा खोरे विकास महामंडळाची १० हेक्टर (२५ एकर) जागा. वीज, पाणी, रस्ता सुविधा व मत्स्य महाविद्यालय शिरगाव यांच्या पाणी परीक्षणात ही जागा योग्य ठरली आहे. जागा मत्स्यव्यवसाय विभागाकडे हस्तांतरित करण्याबाबत मंत्री महोदयांनी सकारात्मक निर्देश दिले.
३. वाशिष्ठी नदी टप्पा-३ गाळ उपसा:
जुलै २०२१ महापुरानंतर गोवळकोट ते बहिरवली टप्पा-३ मध्ये ४२.७८ लक्ष घनमीटर गाळ उपसण्याचे नियोजन आहे. महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डामार्फत काम, ड्रेझर खरेदी व निधीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रस्ताव सादर करावा, अशी मागणी आमदार निकम यांनी केली.
मत्स्यव्यवसाय विकास आणि जनसुरक्षा या दोन्हीला प्राधान्य देत आमदार शेखर निकम यांच्या पाठपुराव्याला मंत्री नितेश राणे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला….
