अलिबाग : दक्षिण रायगड जिल्हा भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्ष चित्रा पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजप महिला मोर्चाने सोमवारी (दि.१२) अलिबागमध्ये काँग्रेस विरोधात आंदोलन केले.
अलिबाग येथील भाजपा मुख्यालय येथे हे आंदोलन करण्यात आले. दक्षिण रायगड जिल्हा भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्ष चित्रा पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनात प्रदेश कार्यकारिणी सदस्य मंजुषा कुद्रेमुर्ती, पंचायत समिती सदस्य प्रियदर्शनी पाटील, महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष आशा बोराडे, तनुजा पेरेकर आदी या आंदोलनात सहभागी झाले होते.
जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू ) ११ विद्यार्थिनींच्या लैंगिक छळ प्रकरणात काँग्रेस खासदार डॉ. अंगोमचा बिमोल अकोइजम यांच्यावरील आरोप अधिकृत चौकशीत सिद्ध झाले असून, विद्यापीठाने त्यांना सेवेतून बडतर्फ केले आहे. त्यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.
ज्या व्यक्तीवर विद्यार्थिनींच्या छळाचे इतके गंभीर आरोप सिद्ध झाले आहेत, त्यांना संसदेत लोकप्रतिनिधी म्हणून बसण्याचा कोणताही नैतिक अधिकार उरलेला नाही. डॉ. अंगोमचा बिमोल अकोइजम यांनी खासदारकीचा तात्काळ राजीनामा द्यावा. काँग्रेस पक्षाने त्यांची पक्षातून तात्काळ हकालपट्टी करावी. पीडित विद्यार्थिनींना न्याय मिळण्यासाठी त्यांच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी आमची मागणी आहे, असे चित्रा पाटील यांनी सांगितले.