चिपळूण : गेल्या दोन महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने कोकणात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. कोकणाच्या गेल्या अनेक वर्षांच्या इतिहासात प्रथमच अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाल्याचे नमूद करत, आगामी काळात पाणीटंचाईचे संकट अधिक गडद होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आतापासूनच पाण्याचा काटेकोरपणे वापर करावा, असे आवाहन चिपळूण नगर परिषदेच्या पाणीपुरवठा समितीचे सभापती निहार कोवळे यांनी केले आहे.

कोयना धरण क्षेत्रातही अपेक्षित पाऊस झालेला नसल्याने वीजनिर्मितीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. वीजनिर्मितीनंतर वाशिष्टी नदीपात्रात सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहावरही त्याचा परिणाम होऊ शकतो. परिणामी, चिपळूण नगर परिषदेच्या पाणीपुरवठा योजनेवरही त्याचे परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

संभाव्य परिस्थितीचा विचार करता नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळून उपलब्ध पाणीसाठ्याचा योग्य वापर करणे आवश्यक आहे. भविष्यातील पाणीटंचाईचे संकट लक्षात घेऊन वेळीच काळजी घेतल्यास परिस्थिती नियंत्रणात ठेवणे शक्य होईल. यासाठी प्रत्येक नागरिकाने पाण्याचा वापर गरजेपुरताच करावा, असे आवाहन कोवळे यांनी केले आहे.

संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी चिपळूण नगर परिषद प्रशासनाकडूनही आवश्यक उपाययोजनांचे नियोजन करण्यात येत आहे. या परिस्थितीत नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे आणि ‘पाणी आहे म्हणून वापरू नका, गरजेपुरतेच वापरा’ हा संदेश लक्षात ठेवावा, असेही कोवळे यांनी म्हटले आहे.