लांजा : शहरातील बाजारपेठ परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर लांजा पोलिसांनी धाड टाकत जुगारासाठी वापरण्यात येणारे संगणक, प्रिंटर, बारकोड स्कॅनर आणि रोख रक्कम असा एकूण ९२ हजार ४१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत एका ४० वर्षीय तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवारी सायंकाळी करण्यात आली. या धाडीनंतर लांजा बाजारपेठेत एकच खळबळ उडाली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोवा-मुंबई महामार्गालगत लांजा शहरातील भाजी मार्केट परिसरात मुकुंद वडापाव स्टॉलजवळील एका गाळ्यामध्ये जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी बुधवारी, ४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६.३५ वाजण्याच्या सुमारास धाड टाकली. या कारवाईमुळे लांजा बाजारपेठेत खळबळ उडाली होती.

दरम्यान, यावेळी मितेश प्रकाश गावडे (वय ४०, रा. मिरजोळे, ता. जि. रत्नागिरी) हा शासनाची कोणतीही अधिकृत परवानगी नसताना स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी जुगार खेळण्यासाठी जागा उपलब्ध करून देत असल्याचे तसेच ग्राहकांकडून पैशांची बाजी लावून जुगार खेळण्यास प्रवृत्त करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

या कारवाईत पोलिसांनी घटनास्थळावरून दोन ३२ इंची टीव्ही, दोन जुने कॉम्प्युटर सीपीयू, दोन एलईडी सीपीयू, दोन इन्स्पॉन कंपनीचे प्रिंटर, दोन एचपी कंपनीचे की-बोर्ड, दोन बारकोड स्कॅनर, माऊस, कुलर, रोख रक्कम तसेच जुगाराच्या नोंदी असलेल्या चिठ्ठ्या असा एकूण ९२ हजार ४१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

याप्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमाच्या कलम ४(१)(अ), ४(१)(क) व १२(अ) अन्वये मितेश गावडे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल विलास जाधव करत आहेत.